रहाटणीत भरतोय बिनशिक्षकाचा वर्ग
By admin | Published: August 30, 2016 01:01 AM2016-08-30T01:01:49+5:302016-08-30T01:01:49+5:30
येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात.
रहाटणी : येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात.याला जवाबदार कोण, असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत.
या शाळेत सकाळी मुलींची व दुपारी मुलांची शाळा भरते. मुलींच्या वर्गाची संख्या ५६० पटसंख्या आहे, तर मुलांच्या वर्गाची ५३० पटसंख्या आहे. येथे पहिली ते सातवी असे वर्ग भरतात.
या शाळेला मागील फेब्रुवारी २०१६पासून मुख्याध्यापकच नाही. सर्व कामकाज येथील एक शिक्षिका प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहत आहेत. या शाळेला संच मान्यतेनुसार १८ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या १२ शिक्षकच कार्यरत आहेत. खरे तर या शाळेला एक मुख्याध्यापक, ५ पदवीधर , १२ उपशिक्षक अशा पद्धतीने शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, मुख्याध्यापक नाही, दोन पदवीधर शिक्षक कमी आहेत. तर एक उपशिक्षक सक्तीच्या रजेवर आहे. त्यामुळे कार्यरत आहेत त्या उपशिक्षकांना वरच्या वर्गाला शिकविता येत नाही. म्हणून सातवीचा वर्ग शिक्षकाविना आहे. या वर्गाची पटसंख्या ४४ आहे. या शाळेत पदवीधर शिक्षकाची आवश्यकता असतानासुद्धा कोणाच्या मर्जीमुळे बदली करण्यात आली, हा खरा प्रश्न आहे.
शाळा सुरू होऊन अडीच महिने झाले, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय? काही दिवसांवर सहामाही परीक्षा येणार. विद्यार्थी शिकणार कधी? परीक्षेत लिहिणार काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनाच्या धोरणानुसार ३० पट संख्येला एक शिक्षक असावा लागतो. मात्र, पालिकेच्या अनेक शाळांमध्ये पटसंख्या नसतानाही शिक्षक मुबलक आहेत . काही शाळांमध्ये २० पटसंख्या असणारे वर्ग आहेत, तरी त्या ठिकाणी शिक्षक आहेत. तर काही शाळांमध्ये वर्ग नसतानाही अतिरिक्त शिक्षक आहेत. याकडे पालिकेचे शिक्षण विभाग व शिक्षण मंडळ डोळेझाक का करीत आहेत, हा खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)