दहावीची पाठ्यपुस्तके आजपासून मिळणार, विद्यार्थी व पालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:23 AM2018-04-03T04:23:08+5:302018-04-03T04:23:08+5:30
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती)च्या वतीने इयत्ता दहावीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवार (दि. ३) पासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून पुस्तकांच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती)च्या वतीने इयत्ता दहावीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवार (दि. ३) पासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून पुस्तकांच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीसह आठवी व पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. ज्ञानरचनावाद या रचनेवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केवळ घोकंपट्टी न करता कृतीतून शिक्षण देण्याच्यादृष्टीने पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी व पालकांना इयत्ता दहावीच्या पुस्तकांची प्रतीक्षा होती. ‘बालभारती’कडून दरवेळी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत उपलब्ध करून दिली जातील, असे सांगितले जाते. त्यामुळे यंदा तरी दहावीची पुस्तके वेळेत मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. इयत्ता नववीची परीक्षा संपल्यानंतर बहुतेक शाळांमध्ये दहावीचे वर्ग सुरू केले जातात.
एप्रिल महिन्यापासूनच वर्ग सुरू होत असल्याने पुस्तके वेळेत मिळावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, शिक्षकांना होती. अखेर बालभारतीने दहावीच्या सर्व माध्यमांतील पाठ्यपुस्तके मंगळवारपासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.
बालभारतीच्या राज्यातील सर्व दहा भांडारांत नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. वितरक, विक्रेत्यांकडून मंगळवारी या भांडारातून पुस्तके घेतल्यानंतर लगेचच बाजारातही ही पुस्तके विद्यार्थी-पालकांना विक्रेत्यांकडून खरेदी करता येतील. यामध्ये दहावीच्या सर्व माध्यमांतील पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे, अशी माहिती बालभारतीकडून देण्यात आली.
दरम्यान, दहावीची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी अद्याप इयत्ता पहिली व आठवीच्या पुस्तकांबाबत बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
पुस्तकांच्या किमती वाढल्या
इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किमती काहीशा वाढलेल्या आहेत. सर्व पुस्तके एकूण ६६४ रुपयांना उपलब्ध होणार आहेत.
विषय पूर्वीची किंमत नवीन किंमत (रुपयांत)
कुमारभारती ६१ ७३
हिंदी ६५ ५७
इंग्रजी ९८ ८८
विज्ञान ९१ १४०
इतिहास ५४ ५६
भूगोल ५४ ४३
बीजगणित ६३ ८०
भूमिती ७१ ७७