Friendship: वर्गमित्रांनी मिळून एका गरीब मित्राला बांधून दिलं घर; जमवला २ लाखांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:49 PM2022-02-23T19:49:49+5:302022-02-23T19:50:00+5:30
सर्व मित्रांनी एकत्र येऊन आपल्या शाळेत असणाऱ्या एका गरीब मित्राला घर बांधून देण्याचा त्यांनी संकल्प केला
कान्हूर मेसाई : शाळेच्या एकाच तुकडीतले जुने मित्र भेटल्यावर गेट टू गेदर करतात. त्यामध्ये एकमेकांना आठवणी सांगितल्या जातात. त्याचवेळी ते ट्रिपच प्लॅनिंगही करतात. परंतु शिरूर तालुक्यातील कान्हूरच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९३/९४ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी मैत्रीचा नवा आदर्श समाजासमोर आणला आहे. सर्व मित्रांनी एकत्र येऊन आपल्या शाळेत असणाऱ्या एका गरीब मित्राला घर बांधून देण्याचा त्यांनी संकल्प केला. आपले त्या वेळचे प्राचार्य वसंतराव वाळुंज यांना खास निमंत्रण दिले.
मिडगुलवाडी येथील सखाराम रघुनाथ मिडगुले हा विद्याधाम विद्यालयात आठवीपर्यंत शिकला व नंतर शाळा सोडली. कोरडवाहू जमीन आणि उत्पन्नाचे काही साधन नसल्याने कसाबसा उदरनिर्वाह करीत शेळी वळत राहिला. साधे मोडकळीस आलेल्या कौलारू जुनाट घरात बायकोमुलांसह राहत आहे. ही बाब त्याच्या काही वर्गमित्रांच्या लक्षात आल्याने त्यांनी इतरांशी चर्चा केली. आणि सुभाष पालेकर,दादासाहेब खर्डे,तात्याभाऊ ढगे,दिलीप आदक,विजय तळोले,संतोष पुंडे,विलास पुंडे,अशोक गोरडे आदींनी पुढाकार घेऊन सखारामसाठी नवीन घर बांधून देण्याचा संकल्प केला. इतर अनेक मित्रांना त्यासाठी आवाहन केले व सर्वांनीच उत्तम प्रतिसाद दिला. त्यासाठी त्यांनी दीड ते दोन लाख रुपयांचा निधी जमा केला. संजय पिंगळे ह्या वर्गमित्राने संपूर्ण घराचे बांधकाम विनामोबदला घेऊन बांधून देण्याचे जाहीर केले.
एरव्ही,स्नेहसंमेलन किंवा गेट टुगेटर म्हणून मुलं एकत्र येतात. कुठंतरी सहल आयोजित करतात. मात्र ९३/९४ च्या ह्या तुकडीने असे काही न करता आपल्या गरीब मित्रासाठी घर बांधून देण्याचा संकल्प केला हे विशेष!! मोठ्या उत्साहात भूमिपूजन करताना सर्व खर्च मित्रांनी आनंदाने केला.