स्वच्छ जिल्ह्यासाठी आता ‘स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:17 PM2019-01-08T23:17:06+5:302019-01-08T23:17:30+5:30
१ जानेवारीपासून सुरुवात : पहिल्या ५ कुटुंबांचा होणार सत्कार
पुणे : जिल्हा हगणदरीमुक्त झाल्यावर तो कायम टिकवण्यासाठी आता जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. सार्वजनिक आणि खाजगी स्वच्छतागृहांच्या वापराबरोबरच ते योग्य आणि त्यांची योग्य स्वच्छता ठेवणाऱ्या कुटुंबाना जिल्हा परिषदेकडून बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून ‘स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेत पहिल्या पाच मध्ये आलेल्या कुटुंबांचा सत्कार करण्यात येणार असून त्यांना पारितोषिकही देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येक ग्रामपंचायतींना सहभागी होणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि. १ जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून दि. ३१ जानेवारीपर्यंत स्पर्धेचा कालावधी असणार आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांकडे असेलेले स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुंदर दिसावेत आणि स्वच्छतागृहाप्रति अभिमानाची आणि स्वामित्वाची भावना निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी गावातील प्रत्येक कुटुंब, शाळा, अंगणवाडीच्या स्वच्छतागृहांवर निसर्गाचे चित्र तसेच रंगकाम करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी गटविकास अधिकाºयांना त्यांच्या स्थानिक पातळीवर नेतृत्व करून ग्रामस्थांना यात सहभागी करून घ्यायचे आहे तसेच त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहेत. १ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. ३१ जानेवारी ही स्पर्धेची अंतिम मुदत आहे. या स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींनी सीएसआर निधीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतागृहांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहावे अशा सुचना दिल्या आहेत.
या स्पर्धेतील पहिल्या पाच कुटुंबांना एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर गावस्तरावर प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाºया तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर देखील तीन उत्कृष्ट तालुक्यांची निवड या स्पर्धेतून केली जाणार आहे.