स्वच्छ पुणे अस्वच्छ पालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:27 AM2018-11-27T11:27:53+5:302018-11-27T11:30:17+5:30
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून जाेरदार कारवाई करण्यात येत अाहे. परंतु पालिकेच्या इमारतीमध्येच अनेक ठिकाणी थुंकलेले अाहे. त्यामुळे पालिकेत देखील कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राहुल गायकवाड / तन्मय ठाेंबरे
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून पुण्याला स्वच्छ करण्याची माेहिम हाती घेण्यात आली अाहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंडच नाहीतर त्यांना रस्ते पुसून घ्यायची शिक्षा दिली. त्याचबराेबर रस्त्यावर कचरा टाकणारे व लघवी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत अाहे. असे असताना महापालिकेतील चित्र मात्र वेगळेच अाहे. महापालिका रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करते मात्र महापालिकेच्या इमारतीच्या काेपऱ्यांमध्ये थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई हाेणार का असा प्रश्न निर्माण झाला अाहे. महापालिकेच्या इमारतीमधील जवळजवळ सर्वच काेपऱ्यांमध्ये गुटखा खाऊन थुंकलेले अाहे. त्यामुळे महापालिकेचा दिव्याखाली अंधार असाच काहीसा प्रकार सुरु अाहे.
2 नाेव्हेंबर पासून पुणे महानगरपालिकेकडून विशेष माेहीम हाती घेऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावर कचरा फेकणारे तसेच सार्वजनिक ठिकणी लघवी व शाैचास बसणाऱ्यांवरही जाेरदार कारवाई करण्यात अाली. 2 नाेव्हेंबर ते 23 नाेव्हेंबर या दरम्यान पालिकेकडून तब्बल 2858 नागरिकांवर कारवाई करण्यात आली अाहे. त्यांच्याकडून 5 लाख 29 हजार 635 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. या माेहिमेचे सर्वच स्तरातून काैतुक हाेत असताना महापालिका इमारत ही सुद्धा सार्वजनिक इमारत अाहे याचा पालिका अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे चित्र अाहे. पालिकेच्या इमारतीमधील अनेक काेपऱ्यांमध्ये तसेच जिन्यांमध्ये थुंकल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीमध्ये अाढळून अाले. पालिकेत विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून तसेच पालिका कर्मचाऱ्यांकडून सुद्धा पालिकेच्या इमारतीमधील भिंतींवर थुंकण्यात येते. जुन्या इमारती बराेबरच नवीन इमरतीमध्ये देखील काही ठिकाणी थुंकलेले अाढळले. पालिकेच्या सर्वच मजल्यांवर सारखेच चित्र हाेते. लाेकमतचे प्रतिनिधी पाहणी करत असताना प्रतिनिधीच्या समाेरच पालिकेतील एक सुरक्षारक्षक इमारतीमध्ये थुंकला. त्यावर कुठलिही कारवाई करण्यात अाली नाही. त्यामुळे पालिका ज्याप्रमाणे रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई करते तशी कारवाई पालिकेत देखिल करणार का असा सवाल उपस्थित केला जात अाहे.
याबाबत पालिकेच्या घणकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पालिकेच्या इमारतीच्या भिंतींवर थुंकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत अाहे. मागच्याच अाठवड्यात अशी कारवाई करण्यात अाली. तसेच पालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना दंड देखील ठाेठावण्यात अाला अाहे. तसेच पालिकेच्या सर्व विभागांना स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत.