स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:59 AM2018-12-26T01:59:45+5:302018-12-26T01:59:57+5:30

वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो.

Clean survey; But the canal was stagnant, the canal became dumping ground | स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड

स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड

Next

वानवडी : वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो. परंतु, या कालव्याची दुरवस्था झाली असून कचराच कचरा दिसत असल्याने कालव्याचे डंपिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागात पाणी मिळण्यासाठी खडकवासला धरणातून ज्या कालव्याद्वारे पाणी सोडले जाते, त्यात कचऱ्याचे प्रमाण खूप वाढले असल्याने जमिनीसारखा भाग तयार होऊन त्यावर कुत्री, जनावरे बसत असल्याने अशा पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तसेच कठड्यांची, भिंतीची दुरवस्था होऊन कालव्याच्या पात्रात ढासळल्याने पात्र कमी होऊन पाण्यातच दगडमातीचे ढीग साचले आहेत.
पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल वाजत असताना जीवनावश्यक गोष्टीपैंकी महत्त्वाच्या समजल्या जाणाºया ‘पाणी’ वाहणाºया कालव्याच्या स्वच्छतेकडे पुणे महापालिका व पाटबंधारे खात्याचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. या कालव्याची कधीही स्वच्छता होत नाही.
तळाला असलेल्या घाणीमुळे जीवजंतू, प्राणी व मृतदेह यात अडकून सडतात व तेच पाणी पुढे शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते.
पुणे शहरातील नदीसुधारणेसाठी केंद्राकडून ९०० कोटी रुपयांची तरतूद झालेली असताना कालव्याच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने लक्ष देऊन पाटबंधारे खात्याशी सल्लामसलत करून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि कालवा स्वच्छ करून ढासळलेल्या, तुटलेल्या भिंतीची बांधणी करावी जेणेकरून स्वच्छ व कचरामुक्त पाणी मिळून कालवाफुटीसारखे प्रकार होणार नाहीत.
काही दिवसांपूर्वीच खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडणे बंद केल्याने कालव्यातील घाणीची, कचºयाची परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
मागेसुद्धा जनता वसाहतीत कालवा फुटल्यानंतर कालव्याची सत्य स्थिती समोर आली होती. परंतु, त्यानंतरही कालव्याच्या स्वच्छतेकडे व दुरुस्तीकडे महापालिका, पाटबंधारे खात्याने फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी पाण्यातील जीव तसेच कालव्यातील पाणी वापरत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता कालवा दुरुस्त करून कचराविरहित करण्याकडे महापालिका व पाटबंधारे खात्याने लक्ष दिले पाहिजे.

संरक्षक कठड्यांची पूर्तता नाहीच...
रेसकोर्स रस्ता ते बी. टी. कवडे रस्ता यांना जोडणाºया कालव्याच्या शेजारील रस्त्याचा काही भाग ढासळला होता. त्यानंतर तिथे भर टाकून तो दुरुस्त करण्यात आला. परंतु, त्याच वेळी कालव्याच्या बाजूने संरक्षक जाळ्या किंवा कठडे लावण्याची मागणी झाली होती.
अद्यापही या ठिकाणी संरक्षक जाळ्या किंवा कठड्याची पूर्तता झालेली नसल्याने कालव्याचे असणारे पात्र रस्त्याच्या समांतर असल्याने वाहने कालव्यात जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे संरक्षक जाळ्या किंवा कठडे लवकरात लवकर लावावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

अधिकारी फोन उचलेनात...
कालव्याचा संबंध ज्या खात्याशी येतो अशा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना कालव्याच्या स्वच्छतेविषयीची माहिती घेण्यासाठी वारंवार फोन केला; परंतु फोन उचलत नसल्याने यासंबंधीची माहिती मिळाली नाही.

कालव्याच्या देखभालीचा निर्णय पाटबंधारे खात्याचा असल्याने त्यांची जर परवानगी व सहकार्य करण्याचे पत्र महापालिकेला मिळाले, तर आमच्या वतीने कालवा स्वच्छ करून संरक्षक जाळ्या किंवा कठडे बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- कालिंदा पुंडे,
नगरसेविका, वानवडी

Web Title: Clean survey; But the canal was stagnant, the canal became dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे