ऐतिहासिक ठेवा असलेली मावलाई देवीच्या विहिरीची स्वच्छता- भुकूम गावाच्या तरुणांचा उपक्रम; हा वारसा जपण्यासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:39+5:302021-04-05T04:09:39+5:30
भुकूम गावातील ऐतिहासिक मावलाई देवीची विहीर आहे. ही विहीर १८ फूट रुंद आणि ३२ फूट लांब आहे. जुन्या काळात ...
भुकूम गावातील ऐतिहासिक मावलाई देवीची विहीर आहे. ही विहीर १८ फूट रुंद आणि ३२ फूट लांब आहे. जुन्या काळात अशा विहिरी बांधल्या जात होत्या. त्यामुळे ही खूप जुनी विहीर असल्याचे बोलले जाते. परंतु याची माहिती मात्र कुठेही उपलब्ध नाही. या विहिरीला अकरा पायऱ्या असून, तीन बाजूला देवळी आहेत. त्यातील मधोमध असणाऱ्या देवळीत मावलाई देवीचा तांदळा आहे. एक गोमुखसुध्दा येथे पाहायला मिळते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अशा प्रकारच्या विहिरी त्यांच्या काळात बांधल्या होत्या. त्यामुळे ही विहीरदेखील त्या काळातील असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विहीर एक ऐतिहासिक ठेवा असल्याने गावातील तरूणांनी एकत्र येत त्याची स्वच्छता केली आहे. त्यामुळे आता ही विहीर अधिक सुंदर दिसत आहे. या विहिरीचे पाणी पूर्वी संपूर्ण गाव पिण्यासाठी वापरत असत. पण नंतर गावात नळ आले आणि विहिरीचे पाणी पिणे बंद झाले. पण या विहिरीत मावलाई देवीचा तांदळा असल्याने या विहिरीला तेच नाव दिले आहे. या विहिरीचे संवर्धन करण्याचा ध्यास या तरूणांनी घेतला असून, तो इतरांसाठी आदर्शवत आहे.
——————————-
गावागावातील विहिरी स्वच्छ व्हाव्यात
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या स्थापत्यकलेने निपुण असलेल्या विहिरी, बारव आहेत. त्यांचीदेखील अवस्था वाईट असून, त्या या मावलाई देवीच्या विहिरीप्रमाणे स्वच्छ करून सुंदर बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक गावातील तरूणांनी पुढे येऊन हा वारसा जपावा, असे आवाहन भुकूमच्या तरूणांनी केले आहे.