स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी आळंदीत बोलक्या भिंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 01:59 AM2018-12-16T01:59:41+5:302018-12-16T02:00:15+5:30
सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे.
आळंदी : आळंदी शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानास ४ जानेवारीपासून यावर्षी ही स्वच्छ सर्वेक्षण २०१९ उपक्रम राबविला जात आहे. या विशेष स्वच्छता अभियानमध्ये आळंदी नगरपरिषद सहभागी झाली असल्याने यासाठीचे कामकाज नगरपरिषदेने सुरू केले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारीसमीर भूमकर यांनी दिली. यासाठी आळंदीत विविध भिंतींवर स्वच्छतेचे संदेश दिले जात असून या बोलक्या भिंती सर्वांचे आकर्षण ठरू लागले आहे.
सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे. मागील वर्षीप्रमाणे अधिकचा सहभाग स्थानिक प्रभागातील नगरसेवक तसेच नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, सामाजिक कार्यकर्ते यांचे योगदान अपेक्षित असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी या तीर्थक्षेत्रासाठी अभियान राबवित गेल्या वर्षीपासून कामकाज सुरू झाले आहे. यावर्षी नगरपरिषदेने अधिक जनजागृती परिणामकारक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये पहिल्या १० नगरपरिषदांमध्ये आळंदीचे नाव आणण्यास संकल्प केला असल्याचे नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. देशातील नागरी भागातील शहरे अधिक सुंदर लक्षवेधी व बोलकी होण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने देखील सार्वजनिक रस्त्यालगतच्या भिंती अधिक बोलक्या करण्याचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदी शहरात सद्या कचराकुंडी मुक्त शहर व कचरामुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सुरू केले आहे. मागील वर्षापासून आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत सहभागी झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणांत या वर्षी पाच हजार गुणांच्या स्पर्धेत सेवास्तर, कचरा संकलन व वाहतूक, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट, माहिती शिक्षण तसेच संवाद, हगणदरीमुक्त आळंदी आदींचा समावेश आहे.
आळंदी नगरपरिषदेने तारांकित मानांकनासाठीदेखील प्रयत्न सुरु केले आहे. या अंतर्गत गुण मिळणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरात जाहिरात फलक जनजागृतीसाठी काम सुरू करण्यात आले आहे. स्वच्छता अॅप, व्यापारी वगार्साठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना सर्व्हेक्षणाच्या काळात प्रश्न विचारले जाणार आहेत. यासाठी समाज प्रबोधन केले जाणार आहे. युवक, तरुण नागरिकांनी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात प्रशासनास सहकार्य करून आळंदीच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन स्वच्छतादूतांकडून केले
जात आहे.