शाळांत स्वच्छतागृहांची दुरवस्था, कचऱ्याचे साम्राज्य
By admin | Published: April 26, 2017 03:01 AM2017-04-26T03:01:48+5:302017-04-26T03:01:48+5:30
जिल्ह्यातील बहुतांश शाळांना नवीन इमारती झाल्या असल्याने परिस्थिती सुधारत आहे. मात्र जिथे अजूनही शाळा जुन्या इमारतीमध्ये भरतात तिथे मात्र
सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील बहुतांश शाळांना नवीन इमारती झाल्या असल्याने परिस्थिती सुधारत आहे. मात्र जिथे अजूनही शाळा जुन्या इमारतीमध्ये भरतात तिथे मात्र मुलभूत सुविधांची वानवा आहे. संरक्षण भिंती आणि सुरक्षारक्षक नसल्याने सुट्यांच्या दिवशी अनेक प्राथमिक शाळा जुगाराचे अड्डे बनलेल्या आहेत.
जिल्हयात इंग्रजी माध्यमांचे पेव फुटले. प्राथमिक शाळांची गुणवत्ता पूर्वीपासूनच चांगली राहीली असती तर इंग्रजी शाळांचे पेव फुटले नसते असे बोलले जात आहे. आता पुन्हा प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मात्र शाळांना शासनाकडून मुलभूत सुविधा अपुऱ्या मिळत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.
कित्येक शाळा जुन्याच इमारतीमधून भरत आहेत. बऱ्याच शाळांमधून मुलींसाठी वेगळया स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे मुलींची कुचंबणा होत आहे. तर ज्या शाळांमधून स्वच्छतागृहाची सोय आहे मात्र देखभालीऐवजी याठिकाणी घाणीचे सामाज्य दिसून येते. अनेक स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेले आहेत, खिडकया फुटलेल्या आहेत, आतील भांडी तुटलेली आहेत तर कमी पाण्याच्या वापरामुळे याठिकाणी दुर्गधी पसरलेली दिसत आहेत.
पटसंख्येच्या प्रमाणात शाळांमधून स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. जेणे करून मुलांना याचा त्रास होणार नाही. तसेच शाळेच्या परीसरामध्ये कचऱ्याचे सामाज्य दिसून येत आहे. अनेक शाळांना इमारती बरोबर संरक्षण भिंतच नसल्याने प्राथमिक शाळा हे मोकाट जनावरे आश्रयस्थान बनले आहे. ज्या शाळांना संरक्षण भिंती आहेत त्या शाळांमधून सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी या शाळा तळीरामांचा आणि जुगार खेळण्याचा अड्डा बनला आहे. या शाळांना संरक्षण भिंती जरी असल्या तरी सुरक्षा रक्षक नसल्याने तळीराम अथवा जुगार खेळणारे संरक्षणभिंती वरून चढून जातात. आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात. ही सरकारी मालमत्ता असल्याने रस्त्याने येणारे जाणारे नागरीकही याकडे दुर्लक्ष करतात. त्याच बरोबर अनेक शाळांमधून ग्रामपंचायतीच्या विहरीवरून अथवा बोअरवेल मधून पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. मात्र या शाळेतील विद्यार्थांनाही आता शुद्ध पाण्याची गरज आहे. (वार्ताहर)