सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Published: July 23, 2015 04:50 AM2015-07-23T04:50:49+5:302015-07-23T04:50:49+5:30
चाकण शहराची नियमित साफसफाई नगर परिषदेच्या सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काम
चाकण : चाकण शहराची नियमित साफसफाई नगर परिषदेच्या सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काम करणाऱ्या या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामगारांना आधी ग्रामपंचायत आणि आता नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याही आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातात अक्षरश: प्लॅस्टिकच्या पिशव्या, पायात चप्पल घालून कुठल्याही मास्कशिवाय अत्यंत दुर्गंधी येणारा सर्व प्रकारचा कचरा उचलण्याचे काम हे सफाई कामगार कुठलीही तक्रार न करता करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून चाकण शहर व परिसरात आणि लगतच्या वाड्यावस्त्यांमध्ये कचरा साठविण्याकरिता ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या कमी पडू लागल्या आहेत. परिसरात बहुतांश भागात कचराकुंड्याच ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांच्या कडेलाच कचऱ्यांचे मोठे ढीग लागतात. कचराकुंड्या असणाऱ्या भागात लहान-लहान कुंड्या लगेचच ओसंडून जातात. बऱ्याच महाभागांना या कुंड्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी सोयीच्या ठिकाणी कचरा टाकणे सोपे वाटते. कचरा उचलण्याची नगर परिषदेची यंत्रणा आजही चांगल्या पद्धतीने कार्यान्वित असतानाही नागरिकांकडून होत असलेल्या दुर्लक्षाने खुद्द प्रशासनही मेटाकुटीस येत असून, सफाई कामगारांचे कंबरडे मोडत आहे. शासनाच्या निणर्यानुसार या कामगारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सुविधा पुरवणे प्रशासनाची जबाबदारी आहे.
परंतु, येथील नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तीन महिन्यांतून किमान एक वेळा तपासणी करणे गरजेचे आहे. सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी तपासणी होत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)