‘कचरा’वाला’ नव्हे; ‘स्वच्छता’दूतच!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:17 PM2020-01-09T18:17:03+5:302020-01-09T18:38:59+5:30
रेड डॉट कॅम्पेन : कचरावेचकांच्या कामाचा सन्मान होणार कधी?
नीलेश राऊत -
पुणे : कचरावेचकांकडून घराची बेल वाजल्यास, घरातील सदस्यांकडून कचऱ्याची बकेट दाराबाहेर ठेवली जाते. ही बकेट देताना कचरावेचकास कचरावाला म्हणून संबोधताना, तो ‘कचरावाला’ नसून हाच आपल्यासाठी ‘स्वच्छतादूत’ आहे हेच आपण विसरत चाललो आहोत.
स्वत: दिवसभर कचऱ्यात काम करून दुसऱ्याला स्वच्छतेचा आनंद देणाऱ्या या कचरासेवकांचा नव्हे, स्वच्छतादूतांचा सन्मान ओला-सुका व सॅनिटरी कचरा वेगळा करून तरी ठेवला जावा, एवढीच माफक अपेक्षा या कचरा वेचकांची आहे.
‘रेड डॉट कॅम्पेन’च्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्ताने औंध येथे एकत्र आलेल्या कचरा वेचकांनी आपल्या व्यथा मांडल्या़ यामध्ये शहरात फिडर पॉइंटवर कुत्री, मांजरी, घुशी यांचा त्रास होतो.
घंटागाडीत सॅनिटरी कचºयासाठी वेगळी व्यवस्था नाही़ ओला कचराही प्लॅस्टिकमध्ये भरून तो कचरा बकेटमध्येच ठेवला जातो, सॅनिटरी नॅपकिन, ड्रायपर कचरा पेटीत ठेवल्याने तेही हाताने वेगळे करावे लागतात. अशा नित्याने सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांना कुठे तरी पर्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
पुणे शहरात सुमारे ४ हजार कचरावेचक नित्यनियमाने घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. वर्षोनुवर्षे आपली सेवा बजाविणाऱ्या कचरावेचकांना आजमितीला प्रतिघरटी ६५ रुपये घेण्याचा अधिकार दिला आहे़. तरीही हे पैसे देताना घासाघीस होतेच.
कचरा गोळा करताना सांडला गेला, बकेटमध्ये थोडा उरला होता, अशी दुसनी त्यांना सुनावली जातात. प्रत्यक्षात आपण कचरा दिल्यावर तो कचरा डेपोपर्यंत जाईपर्यंत त्याची हाताळणी या कचरावेचकांकडून होत असताना त्यांना होणाऱ्या यातनांची, आरोग्याच्या समस्यांची नोंद कुठेही होत नाही.
........
एक दिवस जरी कचरावेचक आला नाही तर आपण सर्वजण कचरावेचकांच्या नावाने ओरड सुरू करतो. परंतु, या कचरावेचकांच्या कामाचा सहानुभूतीने कधीही विचार आपणाकडून अथवा प्रशासकीय पातळीवर पाहिजे तेवढा होत नाही़ .शहराची स्वच्छतेची खरी धुरा या कचरावेचकांवरच अवलंबून आहे. हेच आपण विसरत चाललो असून, आजही त्यांना दुय्यम स्थान देऊन दुर्लक्षित केले जात आहे.
...........
दारोदार जमा झालेल्या ओल्या सुक्या कचऱ्याचे निम्म्यापेक्षा जास्त विघटन याच कचरा वेचकांकडून होत असते. हा कचरा वेगळा करताना अनेकदा त्यातील प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या, लोखंडी तुकडे, कचकड्याच्या वस्तू या वेचकांकडून वेगळ्या करून विकल्या जातात. यातून त्यांना थोडाफार आर्थिक फायदा होतही असेल, परंतु हे करीत असताना त्यांना पूर्ण कचरा हाताने वेगळा करावा लागतो. यामध्ये ड्रायपर, सॅनिटरी नॅपकीन, ओला कचरा, खरकटे अन्न हे नित्याने हाताळावे लागतात. परिणामी अनेकांना त्वचारोगालाही सामोरे जावे लागत असून, इतर आजारांचाही ससेमिरा त्यांच्या पाठी लागला आहे.