Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:07 PM2024-10-28T14:07:14+5:302024-10-28T14:16:11+5:30

पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा बालवडकर यांनी दिला होता

Clear the road to Chandrakant Patil from Kothrud amol Balwadkar decision to rebel is reversed | Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे

पुणे : पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत असताना अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून आले होते. बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता. मी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असल्याने चंद्रकांतदादा माझ्यावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले होते. पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा दिला होता. अखेर त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे दिसून आले आहे. 

कोथरूड मतदार संघात पाटील प्रचार करत असताना बालवडकर आणि त्यांची भेट झाली.  त्यावेळी दोघांनी नाराजी बाजूला ठेवून एकमेकांना पेढा भरवत शुभेच्छाही दिल्या. यावरून अमोल बालवडकर यांनी माघार घेतल्याचे समजते आहे. बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी देण्यात आली. स्थानिक असलेले अमोल बालवडकर यांनी आपल्याला उमेदवारी न मिळल्यास बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते. रविवारी सकाळीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या निवासस्थानी जात त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही यादीची वाट पाहू, असे वक्तव्य बालवडकर यांनी करत नाराजी कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. रविवारी दुपारी भाजपाची पहिली यादी आली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटलांचे नाव आहे. यामुळे बालवडकर बंडखोरीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बावनकुळेंच्या भेटीनंतरही बालवडकर हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. बालवडकर यांनी बंडखोरी केल्यास चंद्रकांत पाटलांची मोठी अडचण होण्याची शक्यता होती. 

आता कोथरूडमध्ये पाटलांचा रस्ता मोकळा झाला आहे. बंडखोरी टळल्याने पाटील पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कोथरुड मतदारसंघामध्ये आता चंद्रकांत पाटील यांना, तर मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारासंघात आता तिरंगी लढत होणार आहे. 

माझे मतभेद दूर झाले 

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देत आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील. - अमोल बालवडकर

Web Title: Clear the road to Chandrakant Patil from Kothrud amol Balwadkar decision to rebel is reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.