शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:21+5:302021-01-16T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोसाठी टाटा कंपनी आणि स्टेट बँक यांच्यात अर्थसाह्यासंबंधीचा करार झाला. यामुळे या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोसाठी टाटा कंपनी आणि स्टेट बँक यांच्यात अर्थसाह्यासंबंधीचा करार झाला. यामुळे या प्रकल्पासाठी अर्थसाह्य मिळविणे टाटाला शक्य होणार आहे. या करारानंतर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारण (पीएमआरडीए) केंद्र सरकारकडे त्यांच्या वाट्याच्या २० टक्के निधीची मागणी करणार आहे.
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी ६ हजार १२४ कोटी रुपये लागणार आहेत. हा प्रकल्प पीपीपी (पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर होत आहे. टाटा कंपनीच्या पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला हे काम मिळाले आहे. केंद्र सरकार २० टक्के, राज्य सरकार २० टक्के व उर्वरित ६० टक्के निधी टाटा कंपनीला उभारावा लागणार आहे. टाटा कंपनी त्यांच्या हिश्याच्या निधीसाठी स्टेट बँकेतून कर्ज घेणार आहे. त्यासाठी प्रकल्प समन्वयक पीएमआरडीएने आवश्यक हमी करारान्वये दिली. त्यानंतर, स्टेट बँक आणि टाटा कंपनीमध्ये करार झाला.
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ.सुहास दिवसे, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविसकर, टाटा कंपनीचे संचालक आलोक कपूर, स्टेट बँकेचे श्रीनिवास गुप्ता, यशकुमार अदुकिया आदी यावेळी उपस्थित होते. या करारामुळे मेट्रो कामासाठी कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, गेले काही महिने मंदावलेले काम आता गती घेईल, असा विश्वास पीएमआरडीए आणि टाटा कंपनीने व्यक्त केला.
चौकट
“शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पातील आर्थिक बाजूचा मोठा टप्पा पार पडला. दुसरीकडे प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. भूसंपादन, खांब उभारणीसाठी माती परिक्षण, ‘कास्टिंग यार्ड’ची जागा व त्याचे विकसन या कामांनाही आता गती मिळत आहे.”
-डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए