क्लेमॅटिस (CLEMATIS) - कल्पनाराज्यातून वर्तमानात या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:25+5:302021-09-13T04:10:25+5:30
निगेटिव्ह क्लेमॅटिस अवस्थेत व्यक्ती अशीच कुठेतरी स्वप्नांच्या जगतात हरवलेली असते. वास्तविक, प्रत्यक्ष जगाशी फारसा संबंध ठेवला जात नाही. दुःखद ...
निगेटिव्ह क्लेमॅटिस अवस्थेत व्यक्ती अशीच कुठेतरी स्वप्नांच्या जगतात हरवलेली असते. वास्तविक, प्रत्यक्ष जगाशी फारसा संबंध ठेवला जात नाही. दुःखद वास्तव टाळण्यासाठी जेव्हा शक्य होईल तेव्हा हे लोक आपल्या मनातील कल्पनाराज्यात जातात, हवेत बंगले बांधण्यात मश्गूल होतात.
वर्तमानास कमी महत्व देत असल्याने यांची शारीरिक क्षमताही बेताचीच राहते. हातपाय नेहमी गार पडतात. स्मरणशक्तीही काहीशी कमजोर असते. जगाच्या रंगमंचावर प्रत्यक्ष भाग घेण्यापेक्षा स्वतःच निर्माण केलेल्या मनःपटलावरील चित्रपटात जास्त गुंग राहिल्याने लवकरच यांना दृष्टिदोष व श्रवणदोष उत्पन्न होऊ शकतो. स्वप्नाळूपणामुळे यांना बऱ्याचदा अपघाताची भीती असते. झोपेची जास्त गरज पडते किंवा काहीवेळा मुद्दाम झोपून राहतात. पुढाकार घेणे तर सोडाच, पण या व्यक्ती फारशी उत्सुकताही दाखवित नाहीत.
कधीतरी असे वाटते की स्वप्नातल्या राजासाठी वा राणीसाठी जीवनाचा त्याग करण्याससुद्धा यांची हरकत नसावी. अर्थात, यामागे इतरही कारणे असू शकतात. पण प्रामुख्याने या जगाशी काही कर्तव्य नसते. म्हणूनच डॉ. बाख यांनी निगेटिव्ह क्लेमॅटिसला “नम्रपणे केलेली आत्महत्या" असे संबोधिले आहे.
या लोकांमध्ये सर्जनशीलता, नवे काही करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे जिथे स्वप्न, कल्पना प्रत्यक्षात उतरते तिथे या व्यक्ती काम करताना आढळतात. उदा. फॅशन डिझाईन, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका, कवी, पत्रकारिता इ. जर यांची सर्जनशीलता प्रत्यक्षात उतरली नाही, तर निगेटिव्ह क्लेमॅटिस स्थिती उत्पन्न होते. यांना हे उमगत नाही की भविष्य हे बऱ्याचदा वर्तमानाच्या गर्भातूनच जन्म घेते व त्यात प्रत्येकाचा सहभाग असतो.
नुसती योग्य वेळेची विनाप्रयत्न वाट बघण्याने यांच्या हातून विश्वाच्या दृष्टीने मोठा अपराध घडतो. इतकेच नाही तर स्वतःच्या अंतरात्म्याच्या हेतूंकडेही डोळेझाक होते. दरवेळेस नुसती उज्ज्वल भविष्याची प्रतीक्षाच करण्याने वेळ, शक्ती यांचा फार मोठा अपव्यय होतो.
क्लेमॅटिसचे सेवन सुरू केल्यानंतर व्यक्ती तिच्या सुपीक डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी योग्य प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येक कृती उत्तम ठरते. क्लेमॅटिस जसे दीर्घकाळ घेतल्याने उपयोगी ठरते तसेच जेव्हा व्यक्ती शारीरिक, मानसिक अशा तात्कालिक दुःखात असते व जगापासून पळून जाऊ इच्छिते त्यावेळेसदेखील उपयोगी पडते. बेशुद्ध व्यक्तीलाही शुद्धीवर आणू शकते. संसर्गजन्य रोगांची भीती घालविण्यासाठी काही तज्ज्ञ क्लेमॅटिसची शिफारस करतात. कारण क्लेमॅटिसमुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक पातळींमधे उत्तम समन्वय साधला जातो. प्रेमात बुडून गेलेल्या व्यक्तींना चिकोरी बरोबर क्लेमॅटिस देण्याने फायदा होतो.
प्रमुख लक्षण – दिवास्वप्न, शेखचिल्लीप्रमाणे वर्तन, शरीर एकीकडे पण मन दुसरीकडे.
ऊर्जा अवरोधाची लक्षणे – कल्पनाराज्यात हरवणे, अनवधानी, अनेक रंजक स्वप्ने, दिवास्वप्न पाहणे, चंचल वृत्ती, निष्काळजी, वास्तवाकडे दुर्लक्ष, गोंधळलेली मनःस्थिती, मनोराज्यात भ्रमण, समस्या उद्भवल्यास विचित्र निराकरण, शून्यात नजर, चांगल्या किंवा वाईट बातमीवर उदासीन प्रतिक्रिया, नेहमी अपघाताची शक्यता, दृष्टिदोष व श्रवणदोष, सहसा क्रोध येत नाही, जीवनशक्ती कमजोर, निर्विकार, जास्त झोपेची गरज, स्मरणशक्ती क्षीण, नीट बघत नाही की नीट ऐकून घेत नाही, चक्कर येऊ शकते, आजारपणातून लवकर बरे व्हावे असे वाटत नाही, स्वतःची क्रिएटिव्हिटी उपयोगात आणता येत नाही, इत्यादी.
औषध सेवनानंतर स्वभावात होणारे बदल – विचारांवर योग्य ताबा, रोज नव्या गोष्टीत रस घेणे, स्वप्नजगत व तेथील कल्पना यांची वर्तमानकाळाशी योग्य सांगड घालता येते, त्यामागचे कारण, परिस्थिती, गूढ अर्थ लक्षात येतो, आत्म्याचे हेतू स्पष्टपणे जाणवतात व त्याप्रमाणे योग्य कृतीदेखील करता येते.
सहाय्यक उपचार – शरीर, मन व बुद्धी मजबूत आणि ताकदवान करण्यासाठी योगाभ्यास करणे, भरपूर उजेड व सूर्यप्रकाशात वावरणे, जे आपल्यात आहे तेच बाहेर आहे असे समजून प्रत्येक गोष्टीत व घटनेत सक्रिय आणि विधायक सहभाग घेणे, क्रिएटिव्ह छंद जोपासणे. उदा. पेंटिंग, संगीत, भरतकाम, विणकाम इत्यादी.
स्वयंसूचनेसाठी घोषवाक्ये – १) मी माझ्या कल्पनाविश्वाचा बाह्य, वर्तमान जगताशी योग्य संबंध जोडीत आहे, २) माझी योजना आत्ता, इथे आहे, ३) मी माझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवीत आहे, ४) मी वर्तमानकाळात वावरत आहे.
क्रमशः …
वैधानिक इशारा : सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे.