MPSC | लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ अभियंतापदे आता ‘एमपीएससी’मार्फत भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:58 PM2022-06-25T16:58:35+5:302022-06-25T17:00:02+5:30
उमेदवारांना मोठा दिलासा...
पुणे : राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. पारदर्शक पद्धतीने भरती होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अराजपत्रित गट ब आणि क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती.
त्यासंदर्भातील पाठपुरावा करत असताना उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री भरणे यांच्या दालनांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये आमदार रोहित पवार यांनी या परीक्षा राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यासाठी मागणी लावून धरली होती. आमदार पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या नियमित पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच ही पदे भरण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत प्रक्रिया सुरू होईल.
यापूर्वी काही विभागांच्या परीक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला; परंतु आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होईल, असा विश्वासदेखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.