एसएमएसवरील लिंकवर क्लिक केल्याने अडीच लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:14+5:302021-06-11T04:08:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बँकेकडून केवायसी अपडेट करण्याचे पत्र आल्यानंतर, त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो बँकेकडून आल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बँकेकडून केवायसी अपडेट करण्याचे पत्र आल्यानंतर, त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो बँकेकडून आल्याचे समजून महिलेने त्यावरील लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपये ऑनलाइनद्वारे चोरले.
याप्रकरणी विमाननगर येथील एका ४२ वर्षांच्या महिलेने विमाननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना ७ जून रोजी ऑनलाइन घडली.
या महिलेचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हडपसर येथील शाखेत बचत खाते आहे. यापूर्वी त्यांना बँकेकडून केवायसी अपडेट करण्याबाबत रजिस्टर पोष्टामार्फत पत्र आले होते. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून त्यांना मेसेज आला. त्यात तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट सस्पेंड केले आहे. खालील लिंक करून तुमचे केवायसी व्हेरिफिकेशन पुन्हा करा, असे सांगून त्यात एक लिंक दिली होती.
बँकेचे पोस्टाने आलेले पत्र आणि आताचा मेसेज पाहिल्यावर या महिलेला हा मेसेज बँकेनेच पाठविला असल्याचा समज झाला. त्यानंतर तिने दिलेली लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच तिच्या अकाऊंटवरून कोणीतरी १४ वेळा ऑनलाइन व्यवहार करून २ लाख ५० हजार ५५८ रुपये काढून घेऊन फसवणूक केली.
सावधान, बँक कधीही पत्र पाठवत नाही
यापूर्वी बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरटे लोकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून त्यांना गंडा घालत होते. तेव्हा बँकांकडून सातत्याने जनजागृती करून बँकेकडून कोणत्याही बाबतीत ग्राहकांना फोन करून माहिती विचारली जात नाही, असे सांगितले गेले. त्याचा परिणाम आता अशाप्रकारचे फसवणूक होण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले होते. त्यावर आता सायबर चोरट्यांनी नवा फंडा काढलेला दिसून येत आहे. बँकेसारखेच पत्र तयार करून अगोदर बँकेच्या ग्राहकांना घरी पत्र पाठवायचे आणि त्यानंतर मेसेज पाठवू लागले आहेत. बँकेचे पत्र आले असल्याने त्यांना मेसेज खरा वाटून ते आलेली लिंक उघडून पाहू लागले आहेत. बँक कोणत्याही कारणासाठी ग्राहकाला घरी पत्र पाठवत नाही. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.