पुण्यातल्या गिर्यारोहकांचे हिमालयातल्या अष्टहजारी शिखराला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:00+5:302021-03-14T04:11:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जगातील दहावे उंच शिखर असलेल्या ८ हजार ९१ मीटर उंचीच्या अन्नपूर्णा-१ वरील रोहणाची मोहिम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जगातील दहावे उंच शिखर असलेल्या ८ हजार ९१ मीटर उंचीच्या अन्नपूर्णा-१ वरील रोहणाची मोहिम गिरिप्रेमी संस्थेने हाती घेतली आहे. येत्या १४ मार्चला गिरिप्रेमीचे चारजण मोहिमेसाठी पुण्यातून रवाना होणार असून प्रत्यक्षात एप्रिलमध्ये चढाई सुरु केली जाणार आहे.
आठ हजार फुट उंचीच्या जगातल्या आठ शिखरांना गवसणी घालण्याचा वसा घेतलेल्या गिरीप्रेमी संस्थेची ही आठवी अष्टहजारी मोहिम आहे. एव्हरेस्ट व कांचनजुंगा या शिखरांवर यशस्वी चढाई करणारा भूषण हर्षे, च्योओयू आणि काचंनजुंगा या शिखरांवर यशस्वी चढाई केलेला डॉ. सुमित मांदळे तसेच कांचनजुंगा या शिखरावर यशस्वी चढाई केलेला जितेंद्र गवारे ही तीन सदस्य मोहिमेत सहभागी झाले आहेत. श्री शिव छत्रपती क्रीड पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे या संघाचे नेतृत्त्व करणार आहेत.
मोहिमेबद्दल माहिती देताना झिरपे म्हणाले, “सन २०१२ मध्ये एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न होता. तेव्हापासून आम्ही सर्व अष्टहजारी शिखर चढाई पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून आहोत. सन २०१२ नंतरच्या पुढच्या सात वर्षात गिरिप्रेमीच्या संघांनी सात अष्टहजारी मोहिमा पूर्ण केल्या. यात माऊंट ल्होत्से (जगातील चौथे उंच शिखर), २०१४ साली माऊंट मकालू (जगातील पाचवे उंच शिखर), २०१६ साली माऊंट च्यो ओयू (जगातील सहावे उंच शिखर) व माऊंट धौलागिरी (जगातील सातवे उंच शिखर), २०१७ साली माऊंट मनास्लु (जगातील आठवे उंच शिखर) व २०१९ साली माऊंट कांचनजुंगा (जगातील तिसरे उंच शिखर) या मोहिमांचा समावेश आहे. आता आठव्या मोहिमेसाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
चौकट
तीव्रा धारांची अवघड चढाई
अन्नपुर्णा-१ हे शिखर नेपाळ हिमालयाच्या अन्नपूर्णा हिमाल पर्वतरांगामध्ये स्थित आहे. या पर्वतरांगांमध्ये अनेक अतिउंच शिखरे असून अन्नपूर्णा पर्वत शिखर समूह विशेष प्रसिद्ध आहे. या पर्वतरांगेत १६ शिखरे सहा हजार मीटरपेक्षा उंच आहेत, १३ शिखरे सात हजार मीटरपेक्षा उंच आणि अन्नपूर्णा-१ हे एकमेव अष्टहजारी शिखर आहे. एकूण ५५ किलोमीटर लांबीचा अन्नपुर्णा शिखर समूह गंडकी व मार्श्यंगदी नद्यांच्या हिमनद्यांनी वेढलेला आहे. आत्तापर्यंत दोनशे ते अडीचशे गिर्यारोहकांनी या शिखरावर चढाई केली आहे. मात्र त्याचवेळेस दर शंभर यशस्वी चढायांमागे ३४ गिर्यारोहकांचा मृत्यूही झाला. गिरिप्रेमीचा संघ उत्तर-पश्चिम धारेने चढाई करणार आहे.