कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कात्रज प्राणी संग्रहालयासह पुण्यातील ४५० उद्याने बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 04:16 PM2020-03-14T16:16:42+5:302020-03-14T16:20:17+5:30
खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर प्रतिबंध
पुणे : राज्यात कोरोनाचे जेवढे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर प्रतिबंध लावले आहेत. महापालिकेनेही सार्वजनिक उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून पालिकेच्या ४५० उद्यानांसह कात्रजचे प्राणी संग्रहालयसुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढले आहेत.
राज्य सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधीचे निर्देश दिलेले असून यात्रा/समारंभ/उत्सव/इत्यादीसह मोठा जनसमुदाय एकत्रित येईल अशा कार्यक्रमांनाही प्रतिबंध करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील उद्यानांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने येतात. दररोज सकाळी फिरायला जाण्यापासून रात्री उशिरापर्यंत या बागा गजबजलेल्या असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उद्यानांमध्ये येत असतात.
उद्यानात येणाऱ्या नागरिकांना एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व उद्याने व राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, नागरिकांसाठी पुढील आदेश होईपर्यंत पूर्ण वेळ बंद ठेवण्यात यावीत असे आदेश देण्यात आले आहेत. उद्यानाच्या गेटवर अशा आशयाचे फलक लावण्यात येणार असून उद्यानांमधील दैनंदिन स्वच्छता विषयक कामे मात्र सुरु राहणार आहेत.
..................