अवैध धंदे बंद करा, अधीक्षकांना मुर्टी ग्रामस्थांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:19 PM2018-08-28T23:19:46+5:302018-08-28T23:20:22+5:30
बेकायदा धंदे बंद करा : पोलिसांकडून ग्रामस्थांच्या मागणीला शून्य प्रतिसाद
बारामती : खासदार आदर्श ग्राम योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या मुर्टी मोढवे (ता. बारामती) येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी ग्रामस्थांनी आता थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाच साकडे घातले आहे. मुर्टी, मोढवे या गावांमध्ये दारू, मटका, जुगार असे आवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. दारू व जुगाराच्या व्यसनांमुळे येथील तरूण पिढी उद्धवस्त झाली आहे. शिकण्यासवरण्याच्या वयात तरूण मुले व्यसनाधीन होत आहेत. येथील अवैध धंद्यामध्ये महिलांचाही सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अवैध धंद्यांमधून सबंधीत व्यक्ती लाखो रूपये कमवत आहेत. जुगार व मटक्याच्या नादामुळे सर्वसामान्य मात्र कष्टाची कमाई घालवत आहेत. येथील जुगार, मटका अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. मात्र कारवाईनंरत मागे लगेच धंदे पूर्ववत सुरू होतात. त्यामुळे पोलीस केवळ कारवाईचा फार्स करीत आहेत, आसाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाप्रमाणे गावामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात ठराव घेतले जातात. ग्रामसभेत ठरावांना मंजुरी देखील मिळते. मात्र त्यानंतरही अवैध धंदे सर्रासपणे सुरू राहतात. यासंदर्भात माध्यमांधून वारंवार बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच येथील ग्रामस्थांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, बारामतीचे उपविभागिय अधिकारी कार्यालय यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याचेही, ग्रामस्थांनी निवेदनामध्ये नमुद केले आहे. गावठी हातभट्टीवरील दारू पिल्यामुळे आप्पासो येळे (रा, मोराळवाडी) यांचा २५ आॅगस्ट २०१८ रोजी मृत्यू झाला असल्याचे, अधिक्षकांना दिलेल्या निवेदानत ग्रामस्थांनी नमुद केले आहे. तसेच अवैध धंदे चालकांमध्ये ग्रामपंचायत सदस्याचादेखील सहभाग आहे. गावातील अवैध धंद्याविरोधत तक्रारी करणाºया तक्रारदारांच्या व त्यांच्या कुटूंबाच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे तक्ररदारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी ग्रामीण अधिक्षकांकडे केली आहे.
स्थानिक पोलिसांना अनेकदा याबाबत ग्रामस्थांनी कल्पना देऊन कारवाईची मागणी केली आहे. यासोबतच ग्रामसभेमध्ये ठरावही करण्यात आलेला आहे. मात्र, हप्तेखोरीमुळे या अवैैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेक अवैैध व्यवसायांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचा आरोप ग्रामस्थांनी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेला आहे. नागरिकांच्या या निवेदनाचा पोलीस गांभिर्याने विचार करुन कारवाई करतात की त्यालाही केराची टोपली दाखविली जाते हा प्रश्न आहे?