राज्यातील कोविड सेंटरमधील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 'फायर सेफ्टी'वर बारीक लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:21 PM2021-04-24T20:21:03+5:302021-04-24T20:39:54+5:30
नुकत्याच नाशिक आणि विरार येथे दोन दुर्घटना घडल्या. यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले
पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोविड सेंटरमध्ये घडत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये वारंवार फायर ऑडिट केले जात आहे. यासोबतच कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांना अग्निप्रतिरोधक यंत्रणा कशी वापरायची आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या बचावासाठी नेमके काय करायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विरार येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ठिकाणी पुन्हा फायर ऑडिट करून घेण्यात येणार असून खाजगी रुग्णालयांनाही याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वच रुग्णालयांमधील 'फायर सेफ्टी'वर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर डॉ. नायडू रुग्णालयामध्ये पहिले कोविड केअर सेंटर सुरू झाले. तेव्हापासून अग्निशामक दल दुर्घटना रोखण्यासाठी सज्ज झाले. खाजगी तसेच शासकीय सेंटरमध्ये सातत्याने अग्नि प्रतिरोधक यंत्रणेची पाहणी केली जात आहे. तसेच तेथील अग्निप्रतिरोधक यंत्रणेसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल दिला जात आहे. यासोबतच प्रशिक्षणावरही भर देण्यात आलेला आहे. ऑडिट करीत असताना आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात तसेच चुका करण्यासंदर्भात संबंधित कोविड केअर सेंटरला अग्निशामक दलाकडून पत्रही देण्यात आलेली आहेत. याबाबतचे सविस्तर अहवाल सातत्याने अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना पर्यंत देण्यात आलेले आहेत.
नुकत्याच नाशिक आणि विरार येथे दोन दुर्घटना घडल्या. यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या सर्व अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वांना खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक देण्यात आले. ज्या रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असेल त्यांना नोटीस देऊन ती सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा ही सूचना देण्यात आल्या आहेत.
-----
भंडारा, नागपूर, मुंबई, विरार या ठिकाणी झालेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये शॉर्टसर्किट होणे हे कारण प्रामुख्याने दिसून आले आहे. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. विद्युत उपकरणे २४ तास वापरली जात असल्याने ती गरम होतात. त्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका अधिक असतो. यासोबतच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उपकरणे तापून आग लागण्याची शक्यता असते.
----
आगीच्या कारणांकडे व्यवस्थापनाने सातत्याने लक्ष द्यायला हवे. विद्युत उपकरणांच्या वायरिंगची सातत्याने तपासणी होणे गरजेचे आहे. या सोबतच कोविड सेंटरमध्ये फायर एक्झिन्ग्यूशर आहेत का आणि ते सुस्थितीत आहेत का हे देखील सातत्याने पाहिले पाहिजे. त्यासाठीचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
----
पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले जात आहेत. या ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना उपायोजना करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे.
-----
अग्निशामक दलाच्या जवळपास ५१० जागा रिक्त आहेत. यामध्ये ‘फायरमन’च्या ३९० जागा आहेत. चालकांचीही कमतरता आहे. शहरात एकूण १४ अग्निशामक केंद्र असून आणखी १२ केंद्रांची आवश्यकता आहे.