आधी वेफर्सचे प्लॅस्टिक बंद करा; मग दुधाचे- राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:44 AM2018-12-09T02:44:16+5:302018-12-09T02:44:34+5:30
सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
पुणे : सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच प्लॅस्टिककोंडी न फुटल्यास दुधाचे भाव १२ ते १५ रुपये लिटरमागे वाढतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिकचा पुनर्वापर न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. प्रत्येक दूध उत्पादकांना आणि वितरकांना बाजारात विकल्या गेलेल्या दुधाच्या पिशव्या संकलित कराव्या लागणार आहेत. मात्र ते शक्य नसल्याने प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने १५ डिसेंबरनंतर प्लॅस्टिकचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्लॅस्टिकबंदी जाणवू शकते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शेट्टी म्हणाले, की दूध पिशव्यांचे संकलन करणे वितरकांना जिकिरीचे होणार आहे. तसेच संकलित झालेल्या पिशव्यांमध्ये काही प्रमाणात दूध शिल्लक असल्याने त्याचा वास येण्याचा अथवा अळ््या होण्याचा संभव असतो. याशिवाय ४५ ते ५० रुपये लिटरमागे खर्च करणारा ग्राहक प्लॅस्टिक पिशवीचा एक रुपया परत मिळविण्यासाठी पिशवी परत देईलच असे नाही. त्यामुळे असे संकलन कटकटीचे होईल. सरकारने दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत अशीच दंडेली सुरू केल्यास आम्ही बाटलीबंद दूध सुरू करू. त्यानंतर मात्र दुधाच्या किमतीत लिटरमागे १२ ते १५ रुपयांची वाढ होईल.
दुधाच्या भेसळीचा आधीच प्रश्न आहे. बाटलीबंद दूध केल्यास भेसळीची शक्यता अधिक वाढते. त्याची जबाबदारी नक्की कोणावर, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसेच बाटलीची स्वच्छता करण्यासाठीदेखील लाखो लिटर पाण्याची आवश्यकता भासेल, याचेही भान ठेवले पाहिजे. सरकारने वेफर्ससह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांवर असेच निर्बंध घालावेत. त्यानंतर दूध पिशवीचा विचार व्हावा.
- राजू शेट्टी