कानठळ्या बंदच! कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५७१ बुलेटस्वारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 01:22 PM2024-02-10T13:22:44+5:302024-02-10T13:24:14+5:30
सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज कराल तर खबरदार, पोलिसांचा इशारा
पुणे : वाहतूक नियम माेडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे धाेके वाढले आहेत. विशेषत: बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांची संख्या वाढत आहे. यातून ध्वनी प्रदूषणही माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. त्यामुळे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल ५७१ बुलेटवर कारवाई केली.
वाहतूक पोलिसांनी येरवडा वाहतूक पोलिस कार्यालय येथे जप्त सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला. यापुढेदेखील कारवाई सुरू राहणार असून, यापुढे सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज कराल तर खबरदार, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. आता वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर आली असून, विविध प्रकारचे नियमभंग करणाऱ्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसरातून जात असताना याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होते. या सर्व पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी मागील दोन दिवसांत शहरात विशेष मोहीम राबविली. यामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार शहरातील सर्वच भागात ही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे ५७१ दुचाकींवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या.
विशेषतः हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, हांडेवाडी, डेक्कन, भारती विद्यापीठ भागात हे प्रकार सर्वाधिक असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. वाहनधारकांकडून पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंड वसूल केला. मॉडिफाइड केलेल्या सायलेन्सरचा पुनर्वापर होवू नये, यासाठी पोलिसांनी ते जप्त केले. शुक्रवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात या सायलेन्सरवरून बुलडोझर चालवून ते निकामी करण्यात आले आहे.
नागरिकांनो, येथे करा तक्रार
नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सरमध्ये बदल करणे, इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी ८०८७२४०४०० या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.