बंद सीसीटीव्ही केले सुरू; ससूनच्या ‘लेडी सिंघम’ कडून रुग्णालयात कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:09 PM2023-01-29T15:09:42+5:302023-01-29T15:09:50+5:30
रुग्णालयात सर्व ठिकाणी रुग्णांना सेवा दिली जातेय का, यावर विशेष लक्ष तसेच रुग्णालयातील स्वच्छता वाढवण्यावर भर
पुणे: ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. भारती दासवाणी यांनी ससून रुग्णालय रुग्णाभिमुख करण्यात माेलाचा वाटा उचलला आहे. बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे, रुग्णसंख्या वाढवणे, मृत्यू कमी करण्याबराेबरच कारभारात पारदर्शीपणा आणला. तसेच उत्पन्नात वाढ केली आहे व कर्मचाऱ्यांना शिस्तही लावली आहे. या सुधारणांमुळे डाॅ. भारती दासवाणी या ससूनच्या ‘लेडी सिंघम’ ठरल्या आहेत.
किडनी रॅकेट प्रकरणात आधीच्या वैद्यकीय अधीक्षकांना गेल्या वर्षी पद गमवावे लागले होते. त्यानंतर काही दिवस हे पद रिक्त हाेते. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंग यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालत डाॅ. दासवाणी यांची गेल्या वर्षी जुलै महिन्यात अधीक्षक पदावर नियुक्ती केली. डाॅ. दासवाणी यांची प्रतिमा ही प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी अशी आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी प्रशासकीय सुधारणा केल्या.
डाॅ. भारती यांच्या कार्यकाळातील सुधारणा
- सर्व सीसीटीव्ही सुरू केले
- रुग्णालयाचे उत्पन्न ४५ लाखांवरून ५७ लाखांवर आणले.
- सुविधा वाढल्याने बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागातील रुग्णांमध्ये १५ टक्के वाढ.
- एमआरआय, साेनाेग्राफी तपासणी संख्या झाली दुप्पट.
- रुग्णालयातील दैनंदिन मृत्यू २१वरून १४वर आले.
महिनाभरात सोडवला वैद्यकीय बिलांचा प्रश्न
डाॅ. दासवाणी यांनी रुग्णालयातील वैद्यकीय बिलांचा प्रश्न प्रामुख्याने हाताळला. यामध्ये त्यांनी वर्षानुवर्षे पैशांसाठी मुद्दामहून पेंडिंग ठेवली गेलेली दीड हजार मेडिकल बिले रात्री १२ ते २ वाजेपर्यंत जागे राहून महिनाभरात संपवली. तसेच दरम्यान जे क्लर्क मेडिकल बिलासाठी सर्वसामान्यांकडून पैसे घेत होते. त्यांची हकालपट्टी केली. त्यामुळे चिरीमिरीचे पैसे जे भ्रष्टाचारी व्यक्तींच्या खिशात जात हाेते ते प्रशासनाच्या खात्यावर जमा हाेऊन रुग्णालयाचा महसूल वाढला.
''रुग्णालयात केस पेपर काढण्याच्या ठिकाणी व इतर महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बंद हाेते ते सुरू करून घेतले. त्याद्वारे सर्व ठिकाणी रुग्णांना सेवा दिली जातेय का, यावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छता वाढवण्यावर भर दिला. तसेच प्रशासनात सुधारणा झाल्याने रुग्णसेवा अधिक सक्षमपणे मिळण्यास मदत हाेत आहे. - डाॅ. भारती दासवाणी, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय''