गणेशोत्सवातील DJ, लेझर शो यांना आवर घाला; पुढे विधानसभा हे लक्षात ठेवा, पुण्यातून सरकारला इशारा
By राजू इनामदार | Published: July 5, 2024 06:22 PM2024-07-05T18:22:01+5:302024-07-05T18:22:56+5:30
मुठभर गणेश मंडळांना खुश ठेवण्यासाठी २ वर्षांपूर्वी बंधनमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतल्याने समस्त पुणेकर ट्राफिक आणि ध्वनी प्रदूषणामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत
पुणे: सत्तेवर येताना दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेला बंधनमुक्त उत्सव हा निर्णय मागे घ्या, डीजेचा आवाज व लेझर शो यांना आवर घाला, लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत हे लक्षात घ्या असा इशारा पुण्यातून सरकारला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्ऱ्यांना यासंदर्भात लेखी पत्र पाठवण्यात आले आहे.
वयाच्या ८० व्या वर्षीही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीत सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले विलास लेले यांनी ज्येष्ठ नागरिक पुणेकर म्हणून हे पत्र पाठवले आहे. मुठभर गणेश मंडळांना खुश ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तुम्ही बंधनमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतला. त्यामुळे समस्त पुणे किमान २ महिने वाहतूक कोंडी व प्रचंड ध्वनी प्रदूषण यामुळे अक्षरशः हैराण होत असते. उत्सवाचे १० दिवस संपूर्ण पुणे शहर वेठीस धरले जाते. त्यात भर पडली आहे ती लेझर लाईटची. अनेकांच्या डोळ्यांना यामुळे इजा झाल्याचे नेत्र तज्ञांकडे चौकशी केली असता निदर्शनास येते अशी स्पष्ट तक्रार लेले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या पत्रात केली आहे.
आळंदी ते पुणे असे २५ किलोमीटर अंतर दहा ते बारा तासात पार करून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामास येतात तेव्हा कोठेही ध्वनी प्रदूषण होत नाही, वाहतूक कोंडी होत नाही, धांगडधिंगा घातला जात नाही, मग हे सर्व गणेशोत्सवात का होऊ शकत नाही? पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस जेमतेम ३ ते ४ किलोमीटरचे अंतर पार करण्यास ३० ते ३२ तास लागतात असे का? या सर्व उत्सवात पोलीस खात्याचा तर जरासाही विचार होत नाही? असे प्रश्नही लेले यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून लेझर लाईट व डी जे यांना उत्सवात बंदी घालावी. राजकीय इच्छाशक्ती दाखवावी, ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत याचाही आपण गांभीर्याने विचार करावा असे लेले यांनी म्हटले आहे.