इंदापुरातील ११५ ग्रामपंचायतींची महसूलची कामे बंद
By Admin | Published: November 18, 2016 05:46 AM2016-11-18T05:46:51+5:302016-11-18T05:46:51+5:30
महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सामुदायिक रजा आंदोलनामुळे तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतींची महसूल विषयक कामे ठप्प झाली
इंदापूर : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सामुदायिक रजा आंदोलनामुळे तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतींची महसूल विषयक कामे ठप्प झाली आहेत. हे आंदोलन चालू राहिले तर त्याचा प्रतिकूल परिणाम शासनाच्या महसूली उत्पन्नाबरोबरच, सर्वसामान्य लोकांच्या महसूलविषयक कामांवर होणार आहे.
आत्ता रब्बी हंगाम सुरु आहे. रब्बी हंगामातील पिकपेरणी सर्वसाधारणपणे या महिन्यात केली जाते. नंतर झालेली पेरणी उत्पादनासाठी फायदेशीर ठरत नाही. सध्याच्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांच्या फटक्यातून लोक सावरले नाहीत.
जमीन खरेदी विक्री, विविध कारणांसाठी, बँक पतसंस्थांतील कर्ज प्रकरणासाठी, न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारे उतारे, विद्यार्थ्यांसाठी लागणारे उत्पन्न रहिवासी दाखले महसूल कर्मचाऱ्यांशिवाय निघत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व कामे ठप्प होणार आहेत.
रोजगार हमी कर, शिक्षण कर, बिगरशेती कर, बेकायदा वाळू उपश्यावरील कारवाईच्या माध्यमातून शासनाकडे जमा होणाऱ्या महसूली उत्पन्नाला ही खीळ बसणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)