लष्कराकडून रस्ता कायमचा बंद
By Admin | Published: October 21, 2015 12:50 AM2015-10-21T00:50:37+5:302015-10-21T00:50:37+5:30
संरक्षण खात्याकडून वारंवार बंद केला जाणारा पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्ती ते रक्षक सोसायटी चौक हा रस्ता रहदारीसाठी खुला करावा, यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी
रहाटणी : संरक्षण खात्याकडून वारंवार बंद केला जाणारा पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्ती ते रक्षक सोसायटी चौक हा रस्ता रहदारीसाठी खुला करावा, यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार संरक्षण विभागाने मंगळवारी २० आॅक्टोबरला सकाळी ६ वाजल्यापासून रस्ता बंदची अंमलबजावणी केली.
काही वर्षांपूर्वी संरक्षण विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कुंजीर वस्ती ते रक्षक सोसायटी चौक हा सार्वजनिक वापराचा रस्ता कायमस्वरूपी बंदच करत आहोत, अशी नोटीस दिली होती. नोटीस मिळाल्यानंतर पालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सुरक्षा भिंती बांधणे, उड्डाणपूल उभारणे असे अनेक पर्याय लष्कराला सुचविले होते. परंतु, लष्कराने सुरक्षेची कारणे देत सर्व पर्याय धुडकावून लावले. त्यानंतर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली गणेश काटे, शांताराम शेलार, राजेश पाटील, कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे संरक्षण खात्याच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करून रस्ता बंद विरोधात स्थगिती मिळवली होती. मात्र, या ठिकाणीसुद्धा संरक्षण खात्याने राष्ट्रीय सुरक्षा आणि अतिरेकी हल्ला अशी कारणे दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. हा रस्ता नागरिकांसाठी नेहमीसाठी खुला राहावा म्हणून शत्रुघ्न काटे, नाना काटे, केंद्रीय पोलाद उत्पादन समिती सदस्य संदीप काटे यांच्यासह अनेकांनी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, त्याला यश आले नाही. (वार्ताहर)
पिंपळे सौदागरला पोलीस छावणीचे स्वरूप
संरक्षण विभागाने कुंजीरवस्ती ते रक्षक सोसायटी चौक रस्ता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून कायमस्वरूपी बंद करणार असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या रस्त्यावर अगदी पहाटे ४ वाजल्यापासून शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते.