डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील नागोरी व खंडेलवालचा क्लोजर रिपोर्ट प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:11 PM2018-08-22T21:11:52+5:302018-08-22T21:25:11+5:30
आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. तपासात काही ठोस पुरावे न मिळाल्याने या प्रकरणी ९० दिवसांत दोषारोपत्र दाखल झाले नव्हते. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी खटला बंद करण्यासंदभार्तील अहवाल ( क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करावा, असा विनंती अर्ज आरोपींचे वकील अॅड.बी. ए. अलुर यांनी सहा महिन्यांपुर्वी दाखल केला होता. यासंदर्भात तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर मांडावे, असे आदेश त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे- पाटील यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत काही निर्णय झालेला नाही.
नागोरी याने अनेकांना बेकायदेशीररीत्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली होती. डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-यांना देखील त्यांनी पिस्तुलाची विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नागोरी व खंडेलवाल यांना पुणे विद्यापीठाच्या आवारात रखवालदाराच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, खुनाच्या गुन्हातही त्यांच्याविरूद्ध पुरावे न आढळल्याने पोलिसांनी दोघांना या गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा विनंती अर्ज न्यायलयाकडे दिला होता. दाभोलकर खूनप्रकरणाचा गुन्हा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केली आहे. तावडेची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने जबाबात नागोरी व खंडेलवाल यांचा उल्लेखदेखील केला नाही. दोघांविरूद्ध ठोस पुरावे नाहीत, असे अॅड. अलुर यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी पकडण्यात आल्याचा दावा सध्या सीबीआय करीत आहेत. या प्रकरणात नागोरी आणि खंडेलवाल यांचा काही सहभाग नसल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर क्लोजर रिपोर्ट सादर करणे अपेक्षित आहे. रिपोर्ट सादर करण्याबाबतचा अर्ज ही सहा महिन्यांपूर्वी करण्यात आला आहे मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही, असे दोघांचे वकील अॅड. बी. ए. अलूर यांनी सांगितेल.
राकेश मारियांनी दिली होती २५ लाखांची आॅफर ?
डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा गुन्हा कबूल करावा यासाठी एटीएसचे तत्कालीन प्रमुख राकेश मारिया यांनी आपल्याला २५ लाख रुपयांची आॅफर दिल्याचा आरोप नागोरी व खंडेलवाल यांनी न्यायालयात केला होता. पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव असून त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यानुसार आम्हाला खोटे आरोपी केल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर दोघांचीही पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांनी हा आरोप मागे घेतला होता. मात्र दोघांनी केलेल्या आरोपांमुळे मारिया अडचणीत सापडले होते तसेच पोलिसांकडून संशयितांवर गुन्हा कबुल करण्याबाबत दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
नुकसान भरपाईचा दावा करणार
नागोरी आणि खंडेलवाल यांचा डॉ. दाभोळकर खून प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दोघांचा या प्रकरणात काय रोल होता हे स्पष्ट झालेले नाही. असे असतानाही त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी झालेल्या मनस्तापाबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे, असे अॅड. अलूर यांनी सांगितले.