खेड-शिवापुरला ढगफुटी सदृश पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:33+5:302021-06-02T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेड-शिवापूर : खेड-शिवापूर परिसरात दुपारी दोन वाजल्यापासून अवकाळी पावसाची जोरदार सुरुवात झाली. जवळपास दीड तास तुफान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेड-शिवापूर : खेड-शिवापूर परिसरात दुपारी दोन वाजल्यापासून अवकाळी पावसाची जोरदार सुरुवात झाली. जवळपास दीड तास तुफान पाऊस बरसला. यामुळे पुणे-सातारा महामार्ग, तसेच सेवा रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. मंगळवारी (दि. १) दुपारी दोनच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. या पावसामुळे सेवा रस्ते, तसेच पुणे-सातारा महामार्गावरील सखल भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचले. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर वेळू परिसरामधील सेवा रस्त्यांवरती नजीकच्या डोंगर परिसरातील पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याकारणाने सेवा रस्त्यांना ओढ्याचे रूप प्राप्त झाले होते. ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्याप्रमाणात सेवा रस्त्यावर पाणी आले आणि २०१३ साली झालेल्या संस्कृती वाडेकर दुर्घटनेची आठवण झाली. जोरदार पावसाबरोबर काही प्रमाणात वाऱ्याला वेग असल्या कारणाने नागरिकांची काही प्रमाणात तारांबळ झाल्याचे दिसून आली. या अवकाळी पावसाने शेतीतील पेरणीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे.
चौकट
मंगळवारी झालेल्या पावसामुळे २०१३ साली कात्रज बोगदा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी पुणे-सातारा महामार्ग व सेवा रस्त्यांची अपूर्ण कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
- अरविंद शिंदे, सरपंच शिंदेवाडी