पाषाणला मंगळवारी दुपारी ढगफुटीसारखा पाऊस; तासाभरात ७७ मिमी पावसाची बरसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 09:57 PM2021-07-06T21:57:39+5:302021-07-06T22:00:14+5:30
पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे : संपूर्ण राज्य पावसाच्या प्रतिक्षेत असताना पाषाण येथील काही भागात मंगळवारी दुपारी ढगफुटीसारखा पाऊस झाला. काही समजायच्या आत मेघगर्जनेसह अचानक जोरदार पाऊस झाला. त्यावेळी शहरात विशेषत: औंध, पुणे विद्यापीठासह इतरत्र थोडाही पाऊस झाला नाही.
पाषाणचा काही भाग आणि बाणेर या परिसरात हा पाऊस झाला. पाषाण येथे हवामान विभागाचे पर्जन्यमापन केंद्र असल्याने या ठिकाणी या पावसाची नोंद झाली. सुमारे तासाभरात ७७.२ मिमी पाऊस पडला.
दिवसाचे उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे स्थानिक अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे दुपारच्या वेळी कम्यलोनिंबस परिस्थिती निर्माण झाली. खालून हवेचा दाब अधिक असल्याने पाणीदार ढगाची निर्मिती झाली. ढगामध्ये एकावर एक बाष्पाचे थर तयार झाले. त्याचवेळी खालून येणार्या हवेच्या दाबापेक्षा या ढगाचे वजन अधिक झाल्याने तो मर्यादित क्षेत्रात कोसळला. लोहगाव भागातही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होत होती. परंतु, तेथे पाऊस झाला नाही.
पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अचानक झालेल्या धो धो पावसामुळे पाषाण परिसरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते़ काही ठिकाणी रस्ते पाण्याने भरुन वाहताना दिसत होते.