पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:22+5:302021-07-04T04:08:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच राज्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील रविवारपर्यंत ...

'Clouds' of concern in the state due to heavy rains | पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’

पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच राज्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील रविवारपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असून ११ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा आणि पन्हाळा येथे पावसाची नोंद झाली असून विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला होता. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम सरी बरसल्या.

गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या घाटमाथ्यासह विदर्भात मोठ्याप्रमाणावर पावसाने ओढ दिली आहे. अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, औरंगाबाद या ६ जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आढळून आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे.

यामुळे होत नाही पाऊस

याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, विषवृत्तीय भागातील आफ्रिकेत पावसाला सुरुवात झाली की तेथील शुष्क हवा आपल्याकडे ढकलली जाते. या हवेत धुलीकणांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसत असले तरी ते उंचावर जाण्यास हे धुलीकण रोखतात. ढगांची निर्मिती झाली या ढगांमध्ये बाष्प असले तरी बाहेरील हवेतील शुष्क हवा त्यांचे थेंबात रुपांतर करण्यापासून रोखले जाते. त्या ढगांमधील पाणी कमी होते. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार होत नाही. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसले तरी सध्या पाऊस पडताना दिसत नाही.

सध्याची स्थिती अजून ११ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

कोकणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाऊस पडत असतो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

६ व ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा व विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

...

पुढील २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे, त्यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Web Title: 'Clouds' of concern in the state due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.