खेड तालुक्यातील पश्चिम भागात ढगफुटीसदृश पाऊस; अतिवृष्टीने जावळेवाडीचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 10:35 AM2021-07-23T10:35:11+5:302021-07-23T10:35:18+5:30
खेडच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
शेलपिंपळगाव : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरात मंदोशी - जावळेवाडी (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा रस्ता व मोरी वाहून गेल्याने जावळेवाडीचा संपर्क तुटला आहे.
खेडच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या भात खाचरांचे अतोनात नुकसान झाले असून काहींच्या घरात पाणी शिरले आहे.
यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी थेट घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना नुकसानीची सविस्तर माहिती दिली. याबाबत तालुकास्तरावर संबंधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली. याप्रसंगी माजी सभापती अरुण चांभारे आणि ग्रामसेवक उपस्थित होते.