ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:40+5:302021-01-10T04:08:40+5:30
सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा ...
सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी मंडलांतर्गत ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.
यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सुरुवातीला पावसाने बाधिकार झाला आहे. मात्र, त्यानंतर थंडी नसल्याने पिकांवर परिणाम झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या जिरायती भागाला चारपैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. येथील बाजारपेठ कांद्यावरच अवलंबून असते. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे गेली. तर अनेक शेतकऱ्यांनी महागाचे कांद्याचे बी आणूनही पावसामुळे गेले. त्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे. या परिसरातील कांद्यावर ढगाळ वातावणाचा परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याची पोषण क्षमता कमी झाली आहे. या वातावरणाचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू आदी पिकांना या वातावरणाचा फटका बसला आहे.
दरम्यान, सुपे येथील कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की सुपे मंडल अंतर्गत सुमारे २७ गावे येतात. या मंडलमध्ये सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी आहे. या क्षेत्रापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारी पिकासाठी तर राहिलेल्या क्षेत्रात गहू, हरबरा आणि कांदा पिके घेतली जातात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. तर राहिलेल्या क्षेत्रात कांदा, गहू, हरबरा करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.
उत्पादनावर परिणाम होण्याची भीती
काही दिवसांपासून ढगाळ हवामान तयार होत आहे. त्याचा फटका कांदा, हरभरा, गहू आणि गोट कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. थंडी गायब झाल्यामुळे पेरलेल्या हरबरा पिकाची वाढ खुंटत असून अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात पडली तर पिके उभारी घेतील, अन्यथा उत्पादनावर याचा परिणाम होईल असे कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांनी दिली.
सुपे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
०९०१२०२१-बारामती-१४
------------------------------