ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:52+5:302021-09-09T04:14:52+5:30
पुणे : श्वसननलिकेमध्ये काही दोष किंवा इजा झाली असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. यातूनच अस्थमाचा त्रास सुरू होतो. पावसाळ्यामध्ये, ...
पुणे : श्वसननलिकेमध्ये काही दोष किंवा इजा झाली असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. यातूनच अस्थमाचा त्रास सुरू होतो. पावसाळ्यामध्ये, ढगाळ वातावरणात हवेतील आर्द्रता वाढल्याचे अस्थमाचा त्रास वाढीस लागतो. विशेषत: कोरोना होऊन गेल्यानंतर फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्याने अस्थमाची लक्षणे तीव्रतेने जाणवू लागतात. त्यामुळे या काळात अस्थमाच्या रुग्णांनी औैषधे, आहार आणि घराबाहेरच्या कामांबाबत विशेष जागरूक राहणे आवश्यक असते.
पावसाळ्यात वातावरणातील ओलसरपणा, तसेच विषाणूच्या संसर्गामुळे अस्थमाच्या रुग्णांना अनेक प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास होतो. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड यांसारखे विषारी वायू पावसाळ्यात हवेत मिसळल्याने योग्यप्रकारे श्वास घेण्यास अडचण येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी अस्थमाचा अटॅक धोकादायक ठरू शकतो. पावसाळ्यात सर्दी आणि फ्लूमुळे अस्थमाच्या रुग्णांमधील गुंतागुंत वाढते. त्यामुळे नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहून स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्ये फुप्फुसापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात. वायूप्रदूषण, धूळ, धूर याप्रमाणेच धूम्रपानाच्या सवयीमुळेही अस्थमा बळावतो. बरेचदा अस्थमा आजार अनुवंशिक देखील असू शकतो.
--------------------
कोरोना होऊन गेलेल्या अस्थमाच्या रुग्णांमध्ये फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे ढगाळ वातावरणात त्यांना जास्त त्रास होतो. गरम पाणी पिणे, वेळेवर औैषधे घेणे, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडणे अशी काळजी अस्थमाच्या रुग्णांची घ्यायला हवी. तेलकट, थंड, आंबट पदार्थ टाळावेत. सर्दी, खोकला अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. पोषक आहारामुळे अस्थमा रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अस्थमाच्या रुग्णांनी नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात रहावे.
- डॉ. मिलिंद भोई, कान-नाक-घसातज्ज्ञ
-----------------------
काय काळजी घ्यावी?
* घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करा.
* दम्याचा त्रास टाळण्यासाठी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करा.
* श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या.
* घरातील कार्पेट, बेडशीट आणि उशीचे कव्हर गरम पाण्याने धुवा.
* धूप स्टिक, डासांपासून बचाव करणारे कॉइल, परफ्यूम आणि डिओडोरंटचा वापर टाळा.
नियमित इन्हेलरचा वापर करा.
* रोगप्रतिकारशक्ती उत्तम करण्यासाठी नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे. जंकफूड, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
------------------------