विदूषकाची ‘सर्कस’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:39+5:302021-06-16T04:12:39+5:30

पुणे : प्रखर देशभक्त विष्णूपंत छत्रे यांनी भारतात ‘सर्कशी’चा पहिला ‘शो’ २६ नोव्हेंबर १८८२ रोजी केला. तेव्हा क्रांतिकारक लपण्यासाठी ...

The clown's 'circus' is on the verge of extinction | विदूषकाची ‘सर्कस’ नामशेष होण्याच्या मार्गावर

विदूषकाची ‘सर्कस’ नामशेष होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

पुणे : प्रखर देशभक्त विष्णूपंत छत्रे यांनी भारतात ‘सर्कशी’चा पहिला ‘शो’ २६ नोव्हेंबर १८८२ रोजी केला. तेव्हा क्रांतिकारक लपण्यासाठी सर्कशीचा आधार घेत असल्याचे सांगितले जाते. असे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सर्कशीचा तंबू कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून उघडलेला नाही. सर्कशीतल्या कलाकारांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. ढासळलेले अर्थकारण आणि प्राण्यांच्या खेळांवर आलेले निर्बंध यामुळे सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

‘सर्कस’ म्हटली की एक मोठा तंबू, गोल रिंगण, रंगीबेरंगी पोशाख घातलेले विदूषक, तरंगते झोपाळे, त्यावर कसरत करणारे कलाकार, वाघ, सिंह, हत्ती, कुत्रा, पोपट, बदक आदी पशु-पक्ष्यांच्या करामती आठवतात. या पशुपक्ष्यांना ‘कंट्रोल’ करणारा रिंगमास्टर डोळ्यांसमोर उभा राहतो. कालपरत्वे सर्कशीतले वाघ, सिंह, हत्ती केव्हाच गायब झाल्याने बालचमूंसाठी असणारी सर्कशीतली गंमत संपली. तरीही सर्कस व्यवस्थापकांनी नवनवे प्रयोग करून सर्कस जिवंत ठेवली. मात्र, कोरोना लॉकडाऊनपासून सर्कशीला उतरती कळा लागली आहे.

अकरा मार्च २०२० रोजी सर्कशीचा तंबू बंद झाला तो उघडलेला नाही. तशी शक्यताही सर्कस व्यवस्थापकांना वाटत नाही. मोबाईल, ऑनलाइन गेमिंगमुळे मुलांचे सर्कशीबद्दलचे आकर्षण जवळपास संपल्यात जमा आहे. शासनाची परवानगी मिळाली, तरी पन्नास लोकांच्या उपस्थितीत सर्कशीचा डोलारा उभारणे अशक्य आहे. त्यामुळे सर्कशीचे भवितव्य अंधारातच असल्याची खंत सर्कस व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे.

सर्कस व्यवस्थापक उमेश आगाशे म्हणाले की, भारतात एके काळी ज्या काही ३० ते ३५ सर्कशी होत्या, त्यातल्या पाच ते सातच राहिल्या होत्या. पुण्यात ‘रॅम्बो’ आणि ‘ग्रेट भारत सर्कस’ या दोनच सर्कशी सुरू होत्या. शासनाने निर्बंध उठवले आणि सर्कस सुरू करायची म्हटली तरी कलाकार मिळायला हवेत. बालमजूर विरोधी कायद्यामुळे मुलांना घेता येत नाही. त्यामुळे हा व्यवसाय संपल्यात जमा आहे.

चौकट

किमान हजार हवेत प्रेक्षक

“पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी दिली तरच सर्कस परवडू शकते. सर्कशीच्या एका ‘शो’ला ९० कलाकार असतात. रोजचा खर्च ७० ते ८० हजार रुपयांच्या आसपास असतो. तीन ‘शो’ला किमान हजार प्रेक्षक तरी हवेत. तरच खर्च निघतो. दीड वर्षापासून सर्कस बंद आहे. हाताला काम नसल्याने काही कलाकार वैफल्यात दारू पिऊन मेले. काहींवर मजुरीची वेळ आली आहे. काम नसल्याने काहीजण गावी परतले. सर्कस जवळपास हद्दपार झाली आहे.”

-उमेश आगाशे, व्यवस्थापक, ग्रेट भारत सर्कस

चौकट

मोटार बायकिंग ते बांधकाम मजूर

“मी मूळचा नेपाळचा असून जवळपास ३४ वर्षांपासून मी सर्कशीत ‘मोटार बायकर’ म्हणून काम करतो. सध्या बांधकामावर मजुरी करून माझा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. रोजच्या कमाईतून काही पैसे कुटुंबीयांना पाठवावे लागतात. जगण्यासाठी सर्कस सोडून दुसऱ्या कामाकडे वळलो. परंतु, मी एक सर्कस कलाकारच असल्याने इतर कामे करणे अवघड जात आहे. कारण इतकी वर्षे त्याच कामाने माझे आयुष्य सुखकर झाले. तेच काम पुन्हा सुरू व्हावे, असे वाटते.”

- प्रकाश श्रेष्ठ, सर्कस कलाकार

चौकट

“आम्ही लहानपणापासून हेच केले आहे. दुसरे काहीच केले नाही. मध्यंतरी आम्ही ‘लाईफ ऑफ सर्कस’ अशी ऑनलाइन सर्कस आयोजित केली. मात्र, शासनाने १८ टक्के जीएसटी लावला. आम्ही जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती. परंतु नियमाप्रमाणे भरावेच लागेल असे सांगण्यात आले. कोरोनाकाळातही कोणतीही सवलत शासनाने दिली नाही. ऑनलाईन जाहिरात करायला देखील पैसे लागतात. शासनाने आम्हाला आणि कलाकारांना थोडी जरी मदत केली असती तर आम्हाला आधार मिळाला असता.”

- सुजीत दिलीप, रॅम्बो सर्कस

-----------------------------------------

Web Title: The clown's 'circus' is on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.