Hello Inspector: टी शर्टच्या लोगोवरून क्ल्यू मिळाला अन् फिरस्त्याच्या खुनाची उकल झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:03 PM2023-12-19T12:03:56+5:302023-12-19T12:05:02+5:30

टी शर्टवरील लोगोमुळे क्ल्यू मिळाला आणि या खून प्रकरणाची उकल झाली....

clue is found from the logo of the t-shirt and the murder of Firsta is solved | Hello Inspector: टी शर्टच्या लोगोवरून क्ल्यू मिळाला अन् फिरस्त्याच्या खुनाची उकल झाली

Hello Inspector: टी शर्टच्या लोगोवरून क्ल्यू मिळाला अन् फिरस्त्याच्या खुनाची उकल झाली

- नारायण बडगुजर

पिंपरी : मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे रस्त्याच्या कडेला बेवारस मृतदेह आढळून आल्याने आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली होती. यात मयताची ओळख पटत नव्हती. मात्र, टी शर्टवरील लोगोमुळे क्ल्यू मिळाला आणि या खून प्रकरणाची उकल झाली.

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणकडून महाळुंगेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कठड्याजवळ १५ जुलै २०२२ रोजी बेवारस मृतदेह मिळून आला. चेहऱ्यावर मारहाण झाल्याने ओळख पटविणे शक्य होत नव्हते. तसेच मयत हा अपंग होता, त्याच्या कपड्यांवरून तो फिरस्ता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. कोणताही पुरावा नसल्याने खून कसा झाला, कोणी केला, कुठे केला याबाबत तपास सुरू होता. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते.

दरम्यान, हिंजवडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी याप्रकणी तपास सुरू केला. पथकांनी कसून तपास सुरू केला असता मयताच्या टी शर्टवर लोगो दिसून आला. ‘अपना भी दिन आयेगा’, असे लिहिलेला लोगो होता. त्याआधारे तपास सुरू केला. शहरातील फिरस्त्या लोकांना तसेच खबऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, फिरस्ता हा मूळचा नांदेड येथील असून, पिंपरी-चिंचवड शहरातील एका दारूच्या दुकान परिसरात तो फिरत होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूच्या दुकानातील कामगारांकडे चौकशी केली. तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मयत फिरस्त्याला मारहाण झाल्याचे दिसून आले.

दारूचा ग्लास सांडल्याने खून

मयत फिरस्ता हा एका जणासोबत दारू पीत असताना दारूचा ग्लास सांडला. त्यामुळे त्याला काठीने व दारूच्या बाटलीने तोंडावर व डोक्यावर मारले. यात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती न दिल्याने गुन्हा दाखल

दारूच्या दुकानाजवळ मारहाणीत फिरस्त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती न देता दारू दुकानवाला आणि दुकानातील कामगारांनी मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकला. त्यामुळे यातील मुख्य संशयितासह दारू दुकानवाला, दुकानातील कामगार तसेच कचऱ्याच्या गाडीचालकावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मयताची ओळख पटविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. टी शर्टच्या लोगोवरून क्ल्यू मिळाला आणि मयताची ओळख पटून खून प्रकरणाची उकल झाली. सीसीटीव्ही फुटेजसह खबऱ्यांचे जाळे त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

- डाॅ. विवेक मुगळीकर, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: clue is found from the logo of the t-shirt and the murder of Firsta is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.