VIDEO: जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कृतीचे होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:47 IST2025-01-04T07:46:10+5:302025-01-04T09:47:50+5:30

आळंदीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

CM Devendra Fadnavis actions won everyone hearts After refusing to wear Chhatrapati Shivaji Maharaj jiretope | VIDEO: जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कृतीचे होतंय कौतुक

VIDEO: जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कृतीचे होतंय कौतुक

CM Devendra Fadnavis:  छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे देशभरासह जगातही  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे हे दाखवून दिलं आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कृतीचे सगळीकडे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एक्स पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आळंदीमधील संत कृतज्ञता सन्मान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी संत, महात्म्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. स्वामी गोविंददेव गिरी महाराज, बाबा महाराज, भास्करगिरी महाराज यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना जिरेटोप देऊन डोक्यावर घालण्याची विनंती केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे जिरेटोप घालण्यास नकार दिला.  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या कृतीची सध्या जोरदार चर्चा होत असून त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करत एक कॅप्शन दिली आहे. "जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना घातला होता जिरेटोप

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याने मोठा वाद उफाळून आला होता. प्रफुल्ल पटेल यांनी १५ मे २०२४ रोजी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरोटोप घातला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवप्रेमींनीही प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ," असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं.
 

Web Title: CM Devendra Fadnavis actions won everyone hearts After refusing to wear Chhatrapati Shivaji Maharaj jiretope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.