मुख्यमंत्र्यांना गिरीश बापट मंत्रिमंडळात नको : काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:07 PM2019-04-04T20:07:44+5:302019-04-04T20:08:43+5:30
शहरातील भाजपाच्या सर्व आमदारांसह शहराध्यक्षही भाजपाचे उमेदवार गिरीष बापट यांच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीमंडळामध्ये बापट नको होते. त्यांना राजकारणातून निवृत्त करायचे होते. त्यामुळेच त्यांना पुण्याची उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे
पुणे : शहरातील भाजपाच्या सर्व आमदारांसह शहराध्यक्षही भाजपाचे उमेदवार गिरीष बापट यांच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीमंडळामध्ये बापट नको होते. त्यांना राजकारणातून निवृत्त करायचे होते. त्यामुळेच त्यांना पुण्याची उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे. तसेच शहराचे खासदार अकार्यक्षम असल्यानेच त्यांना बदलण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.
जोशी यांनी गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संवाद साधला. माजी उपमहापौर डॉ. सतिश देसाई व माजी नगरसेवक वीरेंद्र किराड उपस्थित होते. पुढे जोशी म्हणाले की, बापट यांच्या विरोधात शहरातील सर्व आमदार, शहराध्यक्ष असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढायचे होते. यामध्ये फडणवीस यांचा मोठा हात आहे.
पुण्यासाठी भरपूर पाणी असताना नियोजन नसल्याने शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई आहे. नागपुरमध्ये मेट्रो धावु लागली तरी पुण्यात फक्त खांबच दिसत आहेत. पेन्शनरांचे शहर, सायकलींचे शहर असलेल्या पुण्याची ओळख काँग्रेसने आणलेल्या प्रकल्पांमुळे बदलली आहे. पेन्शनरांचे शहर ते आयटी हब, स्पोर्टस् हब, आॅटोमोबाईल हब ही नवी ओळख पुण्याला मिळाली आहे. मात्र, मागील पाच वर्षांत विकासाला खीळ बसली आहे. विकास हाच मुख्य मुद्दा प्रचारात ठेवून त्यादृष्टीने जाहीरनामा लवकरच प्रसिध्द करू, असे जोशी यांनी सांगितले.