Eknath Shinde Football Kick: पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फुटबॉल किकचीच चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 09:54 PM2022-08-02T21:54:17+5:302022-08-02T22:00:42+5:30
बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी
Eknath Shinde Football Kick: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हडपसर येथे हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरेफुटबॉल मैदान लोकार्पण पार पडले. यावेळी "मी मुख्यमंत्री झाल्याचा अजूनही कुणाला विश्वास बसत नाही. मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही" असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र या सोहळ्यातून जाता जाता चर्चा होतेय ती मुख्यमंत्र्यांच्या फुटबॉल किकची. भाषणानंतर सोहळ्यातून रवाना होण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी मैदानात उतरत फुटबॉलला किक मारून गोल केला आणि लगेच मैदानातून काढता पाय घेतला. त्यांनी मारलेल्या फुटबॉलला किकने साऱ्यांचेच लक्ष वेधले.
दरम्यान, हडपसर येथील एकनाथ शिंदे उद्यानाचे उद्घाटन रद्द झाल्याबाबत त्यांनी कार्यक्रमाचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांची माफी मागितली. "कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. माध्यमात दिवसभर बातम्या झाल्या मात्र मी सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही. सर्वसामान्य माणूस आहे. हे सर्वसामान्य माणसाचे आणि गोर गरीबांचे सरकार आहे", असे पुनरूच्चार त्यांनी केला.
त्या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव!
प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रेमापोटी त्या उद्यानाला माझंच नाव दिलं होतं. पण मी त्यांना म्हटलं की मला कुठे एवढ्या लवकर पाठवता? अशी विनोदी टिपण्णी मुख्यमंत्री शिंदेंनी केली. पण त्यानंतर, उद्यानाचे नामकरण आता धर्मवीर आनंद दिघे उद्यान असं केल्याचे त्यांनी जाहीर केले.
"आज जे आम्हाला गद्दार तसेच बंडखोर अशा उपमा देत आहे, त्यांना राज्यातील जनता उत्तर देत आहे. आम्ही जिथे जात आहोत तिथं आमचं स्वागत केला जातं आहे. जर आम्ही चुकीची भूमिका स्वीकारली असती तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. पण अस न होता आम्ही जिथं जात आहोत तिथं लोक आमचं स्वागत करत आहे", अशी भूमिका यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे-
- बळीराजा सुखी होऊ दे, या राज्यातील साडेबारा कोटी जनता सुखी होऊ दे, हे जेजुरीच्या खंडोबाला मागितलं.
- रस्त्यावर जनता उभी आहे हे उत्तर आहे की आम्ही बरोबर आहोत. जर आम्ही चुकीचे असतो तर जनतेने पाठ फिरवली असती.
- मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला जनतेचा आशीर्वाद मिळतोय. शिंदे-फडणवीस सरकार जनतेला न्याय देणारं सरकार आहे.
- नाना भानगिरे गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. १५ वर्ष झाली नाना निवडून येत आहेत. त्यांचे विशेष अभिनंदन.
- आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेतली आणि राज्यातील विविध ठिकाणी इतर जी प्रलंबित कामे आहेत त्यांचा आढावा घेत उद्घाटन करत आहोत.
- आम्ही जी भूमिका घेतली आहे, त्यात बाळासाहेबांचा विचार आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं आहे.
- मी आणि उपमुख्यमंत्री, आम्ही दोघे जण अतिवृष्टी, पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. राज्याच्या विकासासाठी भविष्यात आम्ही काम करणार आहे.
मोहम्मदवादीचे नाव बदलून महादेववाडी करण्याची मागणी
मोहम्मदवाडीचं नाव बदलून महादेववाडी करावं ही विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रमोदनाना भानगिरे यांनी केली. याच मोहम्मदवाडी येथे बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते.