"आकडे वाढविण्यासाठी उद्योगांसोबत करार केलेले नाहीत..."; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 05:45 PM2023-01-21T17:45:05+5:302023-01-21T17:47:09+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला...
पुणे : गेल्या सरकारच्या काळात काय झाले, कुणासोबत करार झाले, त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण दाओस येथील मेळाव्यात राज्य सरकारप्रति विश्वास व्यक्त झाला. त्यातून मोठी गुंतवणूक झाली आहे. अनेक करार झाले आहेत. आम्ही आकडे वाढविण्यासाठी करार केलेले नाहीत. त्याची अंमलबजावणी येत्या काळात दिसून येईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दाओसमध्ये राज्य सरकारने केलेल्या करारांबाबत टीका होत असल्याच्या पार्श्वभुमीवर शिंदे यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले, “दाओस येथे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारप्रति एक विश्वास दिसला. राज्यात गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा मिळतील, सवलती मिळतील या आशेने अनेक उद्योगांसोबत मोठ्या प्रमाणावर करार झाले. केवळ आकडे वाढविण्यासाठी हे करार झालेले नाहीत. त्याची अंमलबजावणी येत्या काळात दिसून येईल. येथे उद्योगांना पाठिंबा देणारे अनेक देशांचे प्रतिनिधी होते. त्यांनीही भविष्यात राज्यात गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वेळच्या सरकारच्या काळात काय झाले, कुणाबरोबर करार झाले याच्या खोलात मी जाणार नाही. मात्र, दाओसमध्ये राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे करार झाले आहेत. पुढील काळात त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची खात्री पटेल.”
राज्य सरकारने केलेल्या करारांमध्ये उद्योगांमध्ये क्षमता नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे, यावर शिंदे म्हणाले, “राज्यात उद्योगवाढीसाठी मोठी क्षमता आहे, पायाभूत सुविधा आहेत, तसेच कुशल मनुष्यबळही आहे. राज्य सरकारने देऊ केलेल्या सुविधांमुळे राज्यात मोठे उद्योग येतील. आरोप करणाऱ्यांना दुसरे काम नाही पण आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ.”