“मोदी-शाहांमुळे देशात मोठे बदल, एकदा निश्चय केला की ते थांबत नाहीत”; CM शिंदेंची स्तुतिसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 03:09 PM2023-08-06T15:09:09+5:302023-08-06T15:10:15+5:30
CM Eknath Shinde And Amit Shah: अमित शाहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यामुळे पारदर्शकता येऊन संजीवनी मिळाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
CM Eknath Shinde And Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहपुणे दौऱ्यावर आले होते. सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी सांगितले की, आजपर्यंत केंद्रात सहकार विभाग सुरू करण्याची हिंमत अमित शाहांनी दाखवली. बरोबर ना अजित दादा, हे बोलण्याचे मान्य करण्याचे ही धाडस लागते. हे कार्य पाहूनच अजितदादांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नमूद केले.
एकदा निश्चय केला की ते थांबत नाहीत
अमित शाहांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. नवे पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम असणार आहे, सहकार क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. अमित शाहांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. कारखान्यांचा १० हजार कोटींचा कर माफ करण्याचा शाहांनी निर्णय घेतला असून त्यांचे नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, अमित शाहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय सहकार खात्याचे काम उत्तम सुरू आहे. अमित शाह सतत देशहिताचा विचार करतात. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शाहांमुळे सहकार क्षेत्राचा गैरवापर थांबला. अमित शाह यांच्यामुळे सहकार क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. अमित शाह यांच्यामुळे सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. अमित शाहांना सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.