Eknath Shinde | राज्यात नवीन १२२ क्रीडा संकुले उभारणार : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:30 AM2023-01-06T09:30:15+5:302023-01-06T09:35:01+5:30
राज्यातील ग्रामीण भागात आणखी १२२ संकुले नव्याने उभारण्यात येतील...
पुणे : महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दीडशेहून अधिक क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात आणखी १२२ संकुले नव्याने उभारण्यात येतील, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनावेळी काढले.
श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत (बालेवाडी) आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा व युवक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे क्रीडा व युवक खात्याचे सचिव रणजित सिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडायुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांची उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय हे टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात आणि या प्रत्येक टप्प्यावर यश मिळविण्यासाठी खेळाडूंच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत याची नितांत आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जागतिक स्तरावर नेमबाजीत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील याला राज्य शासनाने दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. इतर खेळाडूंनी त्याचे अनुकरण करावे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा अभिमान वाढवला. देशातील नागरिकांना देशभक्तीची काय ताकद असते याची जाणीव करून दिली आहे. त्याचा वारसदार होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रयत्न करावेत. शासनातर्फे सर्व मदत केली जाईल. खेळाडूंनी त्याचा फायदा घेत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पाेहाेचवावे.
ऑलिम्पिक भवन उभारण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन देत गिरीश महाजन यांनी, महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध आहे. तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांकरिता पाच कोटी, जिल्हा स्तरावरील संकुलासाठी २५ कोटी, तर राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलांसाठी ५० कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व ब्राँझ पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे, असे सांगितले.
अजित पवार म्हणाले की, ऑलिम्पिक भवन उभारणीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात. तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता राजकीय मतभेद दूर ठेवत सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो. राज्यामध्ये स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू केली आहे. हे क्रीडा विद्यापीठ लवकरात लवकर सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने मिळवलेला विजेतेपदाचा चषक मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला. तसेच राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या क्रीडा ज्योती एकत्र करून मुख्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली. सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी याने केले.