Eknath Shinde on Chandani Chowk: एकनाथ शिंदे पुन्हा चांदणी चौकात येणार; आज दुपारी २ वाजता, पाहणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:43 PM2022-08-28T12:43:16+5:302022-08-28T12:43:53+5:30
Eknath Shinde on Chandani Chowk: एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्याला निघाले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा गेल्या शुक्रवारी चांदणी चौकात अडविण्यात आला होता. संतप्त पुणेकरांनी तुमच्या ताफ्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार चांदणी चौकात नवा नसून गेली कित्येक वर्षे वाहतूक कोंडी होत असते, त्यातच पुलांची बांधकामे रखडल्याने यात गेल्या दोन वर्षांपासून भर पडली आहे.
एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्याला निघाले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यातच कामावरून घरी निघालेल्या नागरिकांना प्रचंड वाहतुकीला सामोरे जावे लागले. यामुळे नेहमीच्या कोंडीला वैतागलेल्या नागरिकांनी शिंदेंचा ताफा अडविला आणि जाब विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
पुणे - वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी चांदणी चौकात अडवला मुख्यमंत्र्यांचाच ताफा pic.twitter.com/Uvvftpf11l
— Lokmat (@lokmat) August 26, 2022
आज एकनाथ शिंदे सातारा दौरा आटोपून मुंबईकडे निघणार आहेत. दुपारी दोन वाजता ते चांदणी चौकात येऊन तिथे चाललेल्या कामाची पाहणी करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
शिंदे यांचा ताफा अडविल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात धाव घेतली. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील १५ दिवसात परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या ९ लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होते.