मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 09:20 IST2024-12-24T09:19:57+5:302024-12-24T09:20:08+5:30
जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको केला

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी
वाघोली : राज्याच्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणावी, मृतांना २५ लाखांची मदत, शासकीय चार एकर जमीन द्यावी या मागणीसाठी मृत व जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको केला.
हिंमत जाधव पोलिस उपायुक्त परिमंडळ चार तसेच वाघोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी त्यांची समजूत काढून बाजूला घेतले. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाइकांनी भूमिका घेतली. आमची खूपच हेळसांड होत आहे. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. या सर्व मजुरांचे पुनर्वसन करावे, अशीही मागणी ते करत होते.
परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी पोलिस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मतीन भोसले, नामदेव भोसले, राजश्री काळे यांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा भेट घडवून आणून देऊ, असे आश्वासन पोलिसांनी त्यांना दिले. यानंतर ते शहरात भेटीसाठी रवाना झाले. ठोस आश्वासन आल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असे नातेवाइकांनी सांगितले. वाहनचालकाला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मिळाली असून दोन गाडी मालकांपैकी एका गाडी मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.