चाईल्ड केअर सेंटर, पाळणाघर, पक्षकारांसाठी ग्रंथालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:43 AM2017-07-26T07:43:02+5:302017-07-26T07:43:04+5:30
कौटुंबिक न्यायालयाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र इमारत राज्यात सर्वप्रथम पुण्यात उभी राहिली आहे. चाईल्ड केअर सेंटरसाठी प्रशस्त जागा या इमारतीमध्ये असून पाळणाघरही असणार आहे.
पुणे : कौटुंबिक न्यायालयाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र इमारत राज्यात सर्वप्रथम पुण्यात उभी राहिली आहे. चाईल्ड केअर सेंटरसाठी प्रशस्त जागा या इमारतीमध्ये असून पाळणाघरही असणार आहे. पक्षकारांसाठी बैठक व्यवस्था व ग्रंथालयही असणार आहे. प्रत्येक मजल्यावर टीव्हीची सुविधा केली जाणार असून, कौटुंबिक सलोखाविषयक माहिती त्याद्वारे प्रसारित केली जाणार आहे.
कौटुंबिक न्यायालयासाठी उभारण्यात आलेल्या ३ मजली इमारतीचे बांधकाम तब्बल ९ वर्षांनी पूर्ण झाले असून, या इमारतीचे उद्घाटन १२ आॅगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष अॅड. प्रगती पाटील, अॅड. झाकीर मणियार, सचिव अॅड. आशिष पुरोहित, सहसचिव अॅड. नीलेश फडतरे उपस्थित होते.
शिवाजी जिल्हा न्यायालयासमोरील अन्नधान्य गोदामाच्या ३९ गुंठे जागेवर १५ कोटी रुपये खर्चून अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. प्रशस्त पार्किंग असून ३ लिफ्ट आहेत. इमारतीच्या आवारात लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्यही असणार आहे. या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर सध्या अलका चित्रपटगृहाजवळ काम चालणारे कौटुंबिक न्यायालय
नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे, असे कवडे यांनी सांगितले.
फॅमिली कोर्ट अॅक्ट १९८५मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालय ही संकल्पना पुढे आली. २७ जानेवारी १९८९मध्ये पुण्यात पहिले कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. बांधकामासाठी १० कोटी ५३ लाख रुपये मंजूर झाले होते.
भारती विद्यापीठ भवन येथे भाड्याच्या जागेत सातव्या आणि नवव्या मजल्यावर कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज गेली २८ वर्षे सुरु आहे. मात्र सध्याची जागा अपुरी असून, पक्षकारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत.