एक वर्ष वय वाढीच्या सवलतीचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:43+5:302021-08-27T04:16:43+5:30
अमोल अवचिते पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक-दीड वर्षापासून सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामध्ये विशेषतः स्पर्धा ...
अमोल अवचिते
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक-दीड वर्षापासून सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामध्ये विशेषतः स्पर्धा परीक्षा झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत एक वर्ष वयवाढीची सवलत दिली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र विविध विभागाच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. तसेच परीक्षाही येऊ घातल्या आहेत. तरी सुध्दा अजूनही शासन निर्णय न झाल्याने या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कुठलीही जाहिरात प्रकाशित केलेली नाही. सरळसेवा तसेच इतर जाहिराती न निघाल्याने उमेदवारांची वय वाढल्याने संधी हुकणार आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येण्याची शेवटची दोन वर्षे शिल्लक होती. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, तर नवीन जाहिरात प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यात विद्यार्थांची दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे अशा उमेदवारांना परीक्षा देण्याची एक संधी देणे आवश्यक आहे. या संधीचा प्रामुख्याने पोलीस उपनिरीक्षक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून परीक्षेची एक संधी देणे द्यावी. तसेच इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पण एक वर्ष वय वाढीची सवलत द्यावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
---------------
उमेदवारांच्या हिताचा निर्णय घ्यावा
उमेदवारांचे हित लक्षात घेऊन एक वर्ष वय सवलतीचा शासन निर्णय काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आता सरळसेवेच्या काही जाहिराती प्रकाशित होणार आहेत. विविध विभागाकडून पुढील महिन्यात एमपीएससीकडे मागणीपत्रक पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांना संधी मिळू शकते, असे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.