'मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला', पुण्यातील आणखी दोघांचा शिवसेनेला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:06 PM2022-07-11T20:06:23+5:302022-07-11T20:51:14+5:30
शिवसेनेचे किरण साळी आणि अजय भोसले यांचा शिंदे गटात प्रवेश
पुणे : शिवसेनेच्या महाराष्ट्र युवा सेनेचे प्रदेश सहचिटणीस किरण साळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले यांनीही प्रवेश केला. माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी याआधीच शिंदे गटाला जवळ केले आहे.
साळी माजी मंत्री उदय सामंत यांचे समर्थक आहेत. ते तसेच भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला आले होते त्यावेळी त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांसमवेत पंढरपूरला गेले. तिथून आज पुण्यात आल्यानंतर साळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व शिंदे यांच्याबरोबर जात असल्याचे जाहीर केले. त्याही आधी पुरंदरमधील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदे गट जवळ केला आहे.
साळी म्हणाले, मागील अडीच वर्षे शिवसेना अडगळीत व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र प्रकाशात असा प्रकार सुरू होता. पदवीधर विधानसभा मतदारसंघात अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोर उभा करत शिवसेनेच्या उमेदवाराला धोका दिला.मात्र त्याची दखलच पक्षाने घेतली नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा व राजकीय पक्षांमध्ये खाली शिवसेना चौथ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री शिंदे यांनी अखेर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला, आमचीही तीच शिवसेना असल्याने आम्ही तिकडेच जाण्याचा निर्णय घेतला असे साळी यांनी सांगितले.