‘कडक लॉकडाऊन’चे मुख्यमंत्री ठरवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:03+5:302021-05-08T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, मुंबई व राज्यातील एकूण कोरोना स्थितीबाबत उच्च न्यायालयाने त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. त्याआधारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, मुंबई व राज्यातील एकूण कोरोना स्थितीबाबत उच्च न्यायालयाने त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. त्याआधारे कडक लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कोरोना आढावा बैठकीनंतर पवार शुक्रवारी (दि. ८) पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा आणि राज्यस्तरीय कोरोना रुग्ण आकडेवारीत पुण्यात होणाऱ्या चुकीबद्दल पवारांनी मौन पाळले. यासंदर्भात न्यायालयापुढे तथ्य सादर करणार असल्याचे सांगणाऱ्या महापौर मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून ते म्हणाले, “न्यायालयाकडे कोरोना रुग्णांचे आकडे जातात ते पुणे जिल्हा असे जातात. त्यावरून त्यांनी निरीक्षण नोंदवले. महापौर त्याविरोधात न्यायालयात जाणार असले तर जाऊ द्यात. न्यायालयाला बहुधा सुटी आहे, पण ते तातडीच्या कोर्टात जाऊ शकतात.”
मुंबईच्या कोरोना कामाचे देशात कौतुक झाले आहे. पुण्यातही रुग्णसंख्या कमी होत आहे, पण त्याचवेळी ग्रामीण भागात वाढत आहे. बारामतीमध्ये कडक लॉकडाऊन केले, कारण वैद्यकीय तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला. भौगोलिक स्थिती, लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा यातून तो निर्णय झाला. राज्यातील स्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. तेच यासंदर्भात निर्णय घेतील, असे पवार म्हणाले.
दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना धावपळ झाली, याची कबुली पवार यांनी दिली. ते म्हणाले की, ऑक्सिजन, इंजेक्शन अशा स्तरावर आता गडबड होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. ऑक्सिजन प्रकल्प तयार होत आहेत. रुग्णालये, बेड यांची संख्या वाढवण्यात येईल.
चौकट
पोलीस कारवाईचे समर्थन
पोलिसांकडून थोडे काही झाले की सतत तेच दाखवले जाते. पोलीस चांगले काम करत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. लोक सांगूनही ऐकत नाहीत, त्यामुळे असे करावेच लागते, असे अजित पवार म्हणाले. भाजपची टीका राजकीय असल्याचे सांगून ते म्हणाले की, येथे आग लागली तर राज्य सरकार जबाबदार आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात लागली तर नैसर्गिक आपत्ती. मुंबईत आमदार निवास बांधायचा म्हणून त्यांनीच आधीचा पाडला. आता ३०० आमदारांची मुंबईत राहण्याची गैरसोय होते तर नवीन बांधायचा नाही का? अशा टीकेकडे लक्ष द्यायची गरज नाही.
चौकट
काकडेंची विश्वासार्हता
“संजय काकडे यांना प्रदेश उपाध्यक्ष केले तर चांगले आहे. त्यांची विश्वासार्हता काय आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही,” असे अजित पवार म्हणाले.