पोलिसांना गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचविणार ‘सीएमआयएस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:55+5:302021-09-26T04:10:55+5:30
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ॲपचे हस्तांतरण : एका क्लिकवर गुन्हेगारांची कुंडली मिळणार बारामती : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासन ‘हायटेक’ बनले ...
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ॲपचे हस्तांतरण : एका क्लिकवर गुन्हेगारांची कुंडली मिळणार
बारामती : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासन ‘हायटेक’ बनले आहे. आता पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या ‘सीएमआयएस’ ॲपचा वापर करीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. पोलिसांना आता एका क्लिकवर गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून सीएमआयएस हे नवे मोबईल ॲप विकसित करण्यात आले असून, शनिवारी याचे प्रात्यक्षिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे पार पडले. पोलीस दलासाठी या ॲपचे हस्तांतरण करण्यात आले. हे ॲप मोबाईलमध्ये घेणे शक्य आहे. या ॲपमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पत्ता व इतर माहिती एकत्रित करून ती समाविष्ट करण्यात येणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून सीएमआयएस हे नवे मोबईल ॲप विकसित करण्यात आले. त्याचे हस्तांतरण नुकतेच करण्यात आले आहे.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व मिलिंद मोहिते यांच्यासह सीएमआयएस बनविणाऱ्या ‘मार्क टेक्नॉलॉजी’चे संचालक मंगेश शितोळे उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात या ॲपमध्ये रेकॉर्डवरील मालाविषयक गुन्हेगारांची सर्व माहिती भरून घराचे पत्ते व अद्ययावत फोटो भरले जाणार आहेत. यामुळे बदलून आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याला आरोपीचे नेमके राहण्याचे ठिकाण कळण्यास मदत होणार आहे. हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात आले आहे. प्रत्येक आरोपीच्या घराचे लोकेशन (अंतरासहित), आरोपींचा डिजिटल फोटो अल्बम, घटकनिहाय व गुन्हे पद्धतीनुसार गुन्हेगारांची यादी, तडीपार गुन्हेगारांची घटकनिहाय माहिती या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे.