विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून साकारली सीएनजी बाईक
By admin | Published: May 27, 2017 01:23 AM2017-05-27T01:23:48+5:302017-05-27T01:23:48+5:30
येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी सीएनजी बाईक बनवल्याची माहिती प्राचार्य डॉ. गोजे यांनी दिली.
विजय देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बेल्हा : येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी सीएनजी बाईक बनवल्याची माहिती प्राचार्य डॉ. गोजे यांनी दिली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील मयूर सोनवणे, राजन शर्मा, अजित शिंदे व इरफान शेख या विद्यार्थ्यांनी दुचाकीमध्ये असणाऱ्या कार्बोरेटरमध्ये काही प्रमाणात बदल करून व हवेचा प्रवाह कमी प्रमाणात होण्यासाठी त्याच कार्बोरेटरचा कट सेक्शन वापरून दुचाकींचा पिकअप वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सी.डी. १०० या दुचाकीमध्ये सीएनजी इंधनाचा वापर करून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. एअर फिल्टरकडून पास होणारा हवेचा प्रवाह कट सेक्शन कार्बोरेटरमुळे कमी होतो व दुचाकींचा पिकअप वाढविला जातो. यापूर्वी सीएनजीचे किट हे गिअर नसलेल्या दुचाकीवर बसवून प्रयोग करण्यात आलेले आहेत.
पेट्रोल या इंधनाला पर्याय व खचार्ची बचत म्हणून या सीएनजी बाईकचा सर्वसामान्य माणूस विचार करू शकतो. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. अमोल खतोडे, प्रोजेक्ट गाईड प्रा. सचिन निकम यांनी विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाविद्यालय नेहमी अग्रेसर असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे डॉ. दीपराज देशमुख व प्रा. प्रदीप गाडेकर यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.