सीएनजी, ई-बसला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 07:00 AM2019-08-04T07:00:00+5:302019-08-04T07:00:07+5:30
‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे १२० बस १२ वर्षापेक्षा जुन्या आहेत...
पुणे : ताफ्यातील जुन्या बस काढून टाकण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) नवीन बसची वाट पाहत आहे. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ७० सीएनजी व ५० इलेक्ट्रिक नवीन बस येऊनही केवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणाचा हट्ट धरल्याने त्या प्रवाशांच्या सेवेत अद्याप उतरवलेल्या नाहीत. प्रवाशांच्या नशिबी खिळखिळ्या जुन्या बसमधलाच प्रवास अजून आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे १२० बस १२ वर्षापेक्षाजुन्या आहेत. काही बस तर १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार १२ वर्षापुढील बस ताफ्यात काढून टाकणे आवश्यक आहे. पण पर्यायी बसव्यवस्था नसल्याने पीएमपी प्रशासनाकडून या बसमार्फतच प्रवाशांना सेवा दिली जात आहे. पण त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने पुढे आला आहे. दर एक-दोन महिन्याला किमान एका बसला आग लागण्याची घटना घडते. मालकीच्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाणे सरासरी ६० एवढे आहे. त्यामध्ये जुन्या बसचे प्रमाण अधिक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नवीन बस ताफ्यात दाखल होतील, त्याप्रमाणे जुन्या बस स्क्रॅप करण्याची भुमिका प्रशासनाने घेतली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ५०० इलेक्ट्रिक बस घेण्यात येणार आहेत. दोन टप्प्यांत या बस खरेदी करण्यात येणार असून, प्रथम टप्प्यात १५० आणि यानंतर ३५० बस घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील १५० बसपैकी २५ बस या ९ मीटर लांबीच्या असून त्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरीत १२ मीटर लांबीच्या १२५ बसपैकी ५० बसही पीएमपीला मिळाल्या आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच या बस मिळू लागल्या आहेत. तसेच एकुण ४०० सीएनजी बसही घेतल्या जाणार असून त्यापैकी जवळपास ७० बस मिळाल्या आहेत. ई-बस व सीएनजीच्या सुमारे ८० हून अधिक बसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीची प्रक्रियाही पुर्ण झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. असे असतानाही या बस अद्यापही मार्गावर आलेल्या नाहीत. तसेच बस मार्गावर कधी येणार याबाबत ‘पीएमपी’च्या अधिकाºयांमध्येही स्पष्टता नाही.
------------------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ ते १० आॅगस्ट यादरम्यान पुण्यात येणार आहेत. त्यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये ११५ सीएनजी आणि ५० इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल. त्यानंतर या बस मार्गावर येतील.
- सिध्दार्थ शिरोळे, संचालक, पीएमपी
-----------
हट्टापायी बस धूळ खात
नवीन बस तातडीने दाखल करून जुन्या बस हद्दपार करण्याची प्रवाशांची मागणी आहे. पण या बसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा सत्ताधाºयांचा हट्ट आहे. नऊ मीटर लांबीच्या ई-बसच्या लोकार्पणासाठीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी काही दिवस बस मार्गावर येऊ शकल्या नव्हत्या.